मनसुख हिरेन हत्येसाठी ४५ लाखाचा झाला व्यवहार; NIAने व्यक्त केला संशय
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2021 06:06 PM2021-07-02T18:06:53+5:302021-07-02T18:07:55+5:30
Mansukh Hiren Case : या प्रकरणात आणखी काही लोक गुंतलेले आहेत, ज्यांच्याविषयी माहिती मिळवणे आवश्यक आहे.
मुंबई - राज्यात खळबळ उडवून देणाऱ्या मनसुख हिरेन हत्या प्रकरणात आता नवीन खळबळजनक माहिती समोर आली आहे. अँटिलिया येथे कारमध्ये सापडलेल्या स्फोटक आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणाला आता चार महिने उलटून गेले आहेत. या प्रकरणात अलीकडेच एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना देखील NIA अटक केली आहे. या प्रकरणात चार महिन्यांनंतर धक्कादायक माहिती समोर येत आहे. गुरुवारी विशेष NIA कोर्टात सुनावणी झाली. त्यावेळी मनसुख हिरेनच्या हत्येसाठी ४५ लाखाचा व्यवहार झाल्याचा संशय NIA ने व्यक्त केला.
NIA ला या ४५ लाखांच्या व्यवहाराबाबत तपासात माहिती मिळाली आहे. लाल रंगाच्या तवेरा गाडीत मनसुख यांची हत्या केल्यानंतर मारेकरी नेपाळला पळून गेला, असे एनआयएने सांगितले. ४ मार्चला घोडबंदर रोडवर हिरेन सोबत मारेकरी दिसले, ते सीसीटीव्ही फुटेज मिळल्याचे NIA च्या सूत्रांनी सांगितले.
गुरुवारी NIA कोर्टासमोर आरोपी सतीश तिरुपती मुतकोरी आणि मनिष बसत सोनी यांना हजर करण्यात आले. NIAने दोन्ही आरोपींची आणखी पाच दिवसांसाठी कोठडी मागितली. ४५ लाखाचा जो व्यवहार झाला, त्या आधारावर NIA ने आरोपीची कोठडी वाढवून मागितली आहे. हिरेनच्या हत्येसाठी इतकी रक्कम मोजल्याचा एनआयएला संशय आहे. ४५ लाखांच्या व्यवहाराचे पुरावे सापडल्याचे NIAने म्हटले आहे. अँटिलीयाच्या घटनेनंतर हा पैसा मनसुखच्या हत्येसाठी वापरण्यात आल्याचा संशय आहे, कारण मनसुख निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याच्या आदेशाचे पालन करीत नव्हता. एनआयएने म्हटले आहे की, या हत्येतील ४५ लाख रुपयांचा फंड हा अल्प प्रमाणात आहे, त्यात कोट्यावधी रुपये खर्च झाल्याचा संशय आहे. या प्रकरणात आणखी काही लोक गुंतलेले आहेत, ज्यांच्याविषयी माहिती मिळवणे आवश्यक आहे.