सांगलीत ऑनलाईन लुबाडण्यात आलेले ४५ हजार रुपये पोलिसांमुळे परत
By शरद जाधव | Published: September 20, 2022 11:02 PM2022-09-20T23:02:55+5:302022-09-20T23:03:05+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील एका माजी सैनिकाच्या बँक खात्याची माहिती घेऊन ऑनलाईन पध्दतीने काढून घेण्यात आलेले ४५ ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील एका माजी सैनिकाच्या बँक खात्याची माहिती घेऊन ऑनलाईन पध्दतीने काढून घेण्यात आलेले ४५ हजार रुपये परत मिळवून देण्यात पोलिसांना यश आले. एका ऑनलाईनपध्दतीने व्यवहार करणाऱ्या कंपनीच्या माध्यमातून ही लूट करण्यात आली होती. सायबर पोलिसांनी याचा पूर्ण तपास करत पैसे परत मिळवून दिल्याने माजी सैनिकाने समाधान व्यक्त केले.
वीजबिल न भरल्यास वीजजोडणी तोडण्याचा फोन करुन भामट्याने या माजी सैनिकाला जाळ्यात ओढले होते. यात त्यांनी आपल्या क्रेडीट कार्डाची माहिती दिली होती. यानंतर चोरट्याने या कार्डव्दारे ४५ हजार रुपयांची खरेदी केली होती. याबाबतचा मेसेज येताच आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले होते.
यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसात तक्रार दाखल केली होती. ऑनलाईन फसवणूक झाल्यानंतर त्याचा माग काढणे व पैसे परत मिळवून देणे हे मोठे दिव्य असते. तरीही पोलिसांनी तात्काळ याचा तपास सुरु केला.
पोलिसांनी या व्यवहारात बँकेच्या व्यवहारातील दिरंगाई, गाफिलपणा आणि ऑनलाईन व्यवहार कंपनीच्या हलगर्जीपणा त्यांच्या निदर्शनास आणून दिला. अखेर ऑनलाईन व्यवसाय करणाऱ्या कंपनीने ग्राहकाला पैसे परत करण्याचे कबूल केले. त्यांनी बँकेकडे पैसे वर्ग केले आणि ग्राहकाला पैसे मिळाले. ऑनलाईन फसवणूक झाल्यास ते पैसे गेल्यातच जमा अशी समजूत सर्वसामान्यांची झाली असताना सायबर पोलिसांनी मात्र, ते मिळवून दिल्याने त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.