धक्कादायक! ४.७२ लाखांची घरफोडी केली अन् अॅक्टीव्हा गाडी विकत घेतली; आरोपीला अटक
By दयानंद पाईकराव | Published: May 19, 2024 04:13 PM2024-05-19T16:13:40+5:302024-05-19T16:14:22+5:30
विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश
दयानंद पाईकराव, नागपूर: पतीचे निधन झाल्यामुळे मुळगावी गेलेल्या महिलेच्या घरी घरफोडी करून ४.७२ लाखांचा मुद्देमाल चोरी करणाऱ्या आरोपीला व त्याच्या सोबत असलेल्या विधीसंघर्षग्रस्त बालकाला गुन्हे शाखेच्या युनिट ३ ने अटक केली आहे. चोरी केलेल्या पैशातून मौजमजा करण्यासह आरोपीने अॅक्टीव्हा सुद्धा विकत घेतली.
मोहम्मद फैयाज एजाज अन्सारी (२२, रा. रेणुकानगर, गंगाबाग, पारडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ६ मे ते ११ मे दरम्यान संध्या राजु पटेल (३२, रा. वॉर्ड नं. ६, ब्राह्मणी फाटा, कळमेश्वर) या आपल्या पतीचे निधन झाल्यामुळे नरसिंगपूर मध्यप्रदेश येथे मुळगावी गेल्या होत्या. अज्ञात आरोपीने त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलुप तोडुन आत प्रवेश केला. आरोपीने आलमारीतील सोन्या-चांदीचे दागिने व रोख २ लाख ६५ हजार असा एकुण ४ लाख ७२ हजारांचा मुद्देमाल चोरून नेला. संध्या पटेल यांच्या तक्रारीवरून कळमेश्वर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरूध्द कलम ४५४, ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला होता.
दरम्यान गुन्हे शाखेच्या युनिट ३ चे अधिकारी व अंमलदार यांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून त्यांनी आरोपी मोहम्मद फैयाजला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने आपला साथीदार विधीसंघर्षग्रस्त बालकासोबत चोरी केल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यातुन सोन्या-चांदीचे दागिने व चोरीच्या पैशातून विकत घेतलेली अॅक्टीव्हा क्रमांक एम. एच. ४०, ए. बी-२५०२ असा एकुण ३ लाख १२ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपीस कळमेश्वर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.