प्रकल्पबाधितांची ४८ लाख ५० हजारांची फसवणूक, पाच जणांवर गुन्हा दाखल
By मनोज शेलार | Published: September 29, 2023 05:44 PM2023-09-29T17:44:51+5:302023-09-29T17:46:48+5:30
दोन ठेकेदारांसह तीन अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा
मनोज शेलार/नंदुरबार: प्रकल्पबांधितांना करून देण्यात येणाऱ्या कुपनलिकांचे काम न करता एकुण ४८ लाख ५३ हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दोन ठेकेदारांसह तीन अधिकाऱ्यांविरुद्ध अक्कलकुवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एप्रील २०१७ मध्ये याबाबत काम देण्यात आले होते.
गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये तत्कालीन नर्मदा विकास विभागाचे कार्यकारी अभियंता एस.जे.सोनवणे, सहायक अभियंता जयराम त्र्यंबक वाखरडे, अनिष्ठ अभियंता अनुज युवराज ठाकुर, अनिल साळुंखे, रा.साक्री व किरसिंग हुण्या वसावे, रा.देवमोगरा पुनर्वसन, ता.अक्कलकुवा असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.
पोलिस सूत्रांनुसार, एप्रिल २०१७ मध्ये सरदार सरोवर प्रकल्प बाधितांसाठी कुपनिलका करून देण्याचा ठेका देण्यात आला होता. काम पुर्ण न करता पाचही जणांनी संगणमताने ४८ लाख ५३ हजार १६० रुपयांच्या रक्कमेचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. याबाबत नर्मदा विकास उपविभागाचे कनिष्ठ अभियंता गौरव जगदीश परदेशी यांनी २८ सप्टेंबर रोजी याबाबत फिर्याद दिल्याने पाचही जणांविरुद्ध अक्कलकुवा पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलिस निरिक्षक दिपक बुधवंत करीत आहे.