व्यवसायात गुंतवणुक करण्याच्या बहाण्याने ४८ लाखांची फसवणूक; २२ जणांना घातला गंडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 07:55 PM2020-06-20T19:55:09+5:302020-06-20T19:55:51+5:30
लोकांना ६ टक्के कमी व्याजाने पैसे देण्याचे आमिष दाखविले. त्यांना कोटी रुपयांपर्यंत कर्ज देण्याचे आश्वासन दिले.
पुणे : व्यवसायात गुंतवणुक करण्याचा बहाणा करुन तिघांनी २२ जणांना तब्बल ४८ लाख रुपयांना गंडा घालून कंपनी बंद करुन फरार झाल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी मनिष शहा, अमित शर्मा आणि दिलीप मोदी (सर्व रा़ एम आय टी, कोथरुड) यांच्याविरुद्ध महाराष्ट्र ठेवीदारांचे रक्षण कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, या तिघांपैकी दिलीप मोदी हा सराईत व्हाईट क्रिमिनल असून त्याने अशाच प्रकारे लोकांना गुंतवणुक करण्याचे आमिष दाखवून मुंबईत फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या तिघांनी कर्वे रोडवरील गणेश चेंबरमध्ये सिटी वेंचर बिझ व बालाजी असोएिशयटस या नावाने कंपनी जानेवारी २०२० मध्ये उघडली. लोकांना ६ टक्के कमी व्याजाने पैसे देण्याचे आमिष दाखविले. त्यांना कोटी रुपयांपर्यंत कर्ज देण्याचे आश्वासन दिले. त्याच्या प्रोसेसिंग फीच्या नावाखाली लोकांकडून पैसे घेतले़ मात्र, त्यांना कर्ज दिलेच नाही.
त्यांनी आणखी एक योजना लोकांना सांगून त्यात गुंतवणुक करायला सांगितली. एका कार घेऊन ती कंपनीकडे ठेवायची. तिचे २ लाख रुपये डाऊन पेमेंट भरायचे बाकी पैसे कंपनी भरले व त्यांना महिना ५० हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. त्यांच्या भूलथापांना बळी पडून लोकांनी त्यांच्याकडे पैसे भरले. परंतु, कोणालाही कर्ज मिळाले नाही किंवा २ लाख रुपये डाऊन पेंमेंट भरले तरी गाडी काही मिळाली नाही. तसेच महिना ५०हजार रुपयेही मिळाले नाही. त्यामुळे लोकांना त्यांचा संशय येऊ लागला़ तेव्हा ३ मार्च २०२० रोजी त्यांनी ऑफिस बंद करुन ते तिघेही पसार झाले. ऑफिस बंद झाल्यावर त्यांनी लोकांना काही दिवस झुलत ठेवले. दरम्यान, लॉकडाऊन सुरु झाल्याने आता ऑफिस उघडता येणार नाही, अशी वेगवेगळी कारणे देत ते लोकांना आश्वासन देत राहिले. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर लोकांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे़. त्यांच्या भूलथापांना आतापर्यंत २२ जण बळी पडल्याचे समोर आले आहे. त्यांनी दिलेल्या पत्त्यावर पोलिसांनी शोध घेतला. परंतु, ते तेथेही सापडले नाहीत. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल झाजुर्ण अधिक तपास करीत आहेत.