११ चोरीच्या मोटारसायकलसह ५ आरोपींना अटक; तीन गुन्हे उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 09:37 PM2021-11-11T21:37:59+5:302021-11-11T21:39:14+5:30
Robbery Case : एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले.
लातूर : ११ चोरीच्या मोटारसायकलसह खरेदी व विक्री करणा-या पाच आरोपींना एमआयडीसी पोलीसांनी गुरुवारी अटक केली असून, ६ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये मोटारसायकल चोरीचे गुन्हे दाखल झाले होते. त्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी पथक स्थापन करण्यात आले. या पथकाला मोटारसायकल चोरी करणारे रिंग रोडवरील एका धाब्यावर जेवनासाठी येणार असल्याचे समजले.
खात्रीशीर गोपनीय माहिती मिळाल्याने सापळाला लावण्यात आला. या सापळ्यात दोनजण अडकले. त्यांना विश्वासात घेऊन मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्यांनी संतोष सोपान माने, वय २४. रा. लोदगा ता. औसा, अंकुश राम कांबळे वय. ३० रा. ओसवाडी ता. लातूर स्वताची नावे असल्याचे सांगितले. त्यांच्याकडे दुचाकी चोरीची विचारपूस केली असता लातूरसह अन्य शहरातून मोटारसायकली चोरी केल्याचे कबुल केले. या चोरलेल्या मोटारसायकली लातूर शहरातील विविध लोकांना विक्री केल्याचेही सांगितले. त्यांच्याकडून शेख सिद्दीक खय्युम, रा. सपकाळनगर लातूर, लक्ष्मण मनोहर कांबळे रा. सपकाळनगर लातूर, आदिल उस्मान कुरेशी रा. हत्तेनगर लातूर यांनी खरेदी केल्याचे सांगितले. त्यावरुन वरील पाच जणांकडून एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्यात एक अशा चार गुन्ह्यात ११ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. याची किंमत ६ लाख ७० हजार असल्याचे पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले यांनी सांगितले.
मोटारसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आणण्याच्या कामी पोलीस निरीक्षक संजीवन मिरकले, पोलीस उपनिरीक्षक संदीप कराड, पोलीस अंमलदार बेल्लाळे, अर्जुन राजपुत, प्रशांत ओगले, मुन्ना मदने, अनिल कज्जेवाड, मदार बोपले, जाधव, शिंगाडे, गोडबोले, शिंदाडकर आदींनी परिश्रम घेतले.