यवतमाळ : तलवारीने केक कापून नाचगाणे करणाऱ्या ५ आरोपींना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 11:18 AM2021-04-05T11:18:51+5:302021-04-05T11:18:51+5:30
व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल, सावळेश्वरची घटना
व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल, सावळेश्वरची घटना
यवतमाळ : जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील सावळेश्वर येथे वाढदिवसाचे औचित्य साधून चक्क तलवारीने केक कापल्याची घटना समोर आली आहे. तसेच वाढदिवसाचा केक कापून कार्यक्रमात तलवार फिरवल्याचे व्हिडीओ चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल झाले. याप्रकरणी पोलिसांनी तलवार जप्त करून वाढदिवस असलेल्या कपिल काळबांडे व इतर ४ आरोपींना अटक केली.
बिटरगांव पोलीस स्टेशन अंतर्गंत येणाऱ्या सावळेश्वर येथे कपिल काळबांडेच्या २५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. गाण्याच्या तालावर बेधुंदपणे थिरकत असतांनाच वाढदिवस असलेल्या तरूणाने भावनेच्या भरात घरातील तलवार आणून केक कापला. गाण्याच्या तालावर तलवार फिरवत सिद्धार्थ काळबांडे, अजय काळबांडे, आकाश काळबांडे व स्वप्नील काळबांडे समवेत नाचू लागला. या अफलातून प्रकरणाचा व्हिडीओ तयार करुन व्हॉट्सअॅप वर क्लिप व्हायरल करुन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
गोपनीय माहितीच्या आधारे सावळेश्वर येथे पोलीस पोहचले व त्यांनी तलवार जप्त करून कपिल काळबांडे आणि त्याच्या ४ साथीदारांना अटक केली. बिटरगांव पोलीसांनी कोरोना महामारीच्या आदेशाचे उल्लंघन करणे व आर्म अॅक्ट नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. ठाणेदार विजय चव्हाण हे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.