अबब... ड्रग इन्स्पेक्टरकडे 5 पोती भरून नोटा जप्त बिहारमध्ये पाच ठिकाणी छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2022 08:50 AM2022-06-26T08:50:28+5:302022-06-26T08:51:23+5:30
निगराणी ब्यूरोने टाकलेल्या छाप्यांमध्ये एक खोली उघडली असता, अधिकारी अवाक् झाले. त्या खोलीमध्ये पाच पोती भरून नोटा मिळाल्या.
एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारमधील ड्रग इन्स्पेक्टर जितेंद्र कुमार यांच्याकडे तब्बल पाच पोती भरून नोटा आढळल्यामुळे खळबळ उडाली आहे. पाच ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये सापडलेल्या नोटा मोजण्यासाठी मशीन मागविण्यात आली आहे.
निगराणी ब्यूरोने टाकलेल्या छाप्यांमध्ये एक खोली उघडली असता, अधिकारी अवाक् झाले. त्या खोलीमध्ये पाच पोती भरून नोटा मिळाल्या. या नोटा तब्बल १.५ कोटी रुपयांच्या असू शकतील, असा अंदाज आहे. छाप्यात अडीच किलो चांदी व अर्धा किलोपेक्षा जास्त सोन्याचे दागिने आढळले.
या छाप्यात मालमत्तेची अनेक कागदपत्रे पथकाच्या हाती लागली आहेत. जलालपूर शहरात एक फ्लॅट, जहानाबादमध्ये घर व जमिनीची कागदपत्रे यात आहेत.
पाटण्यात त्यांचा एक फ्लॅट आहे. झारखंडची राजधानी रांचीमध्ये त्यांचा आणखी एक फ्लॅट आहे. याबाबत तपास सुरू असून, आणखी मालमत्ता बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नोटा मोजण्यासाठी मशीन मागविली आहेत.
दोन कोटींपेक्षा मोठे घबाड
हा अधिकारी पदाचा दुरुपयोग करून भ्रष्टाचार करीत होता, असा आरोप आहे. राज्य सरकारकडे त्याच्याबद्दल अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यानंतर एक पथक तयार करून त्याच्यावरील आरोपांची चौकशी करण्यात आली. त्याच्याकडे दोन कोटी रुपयांपेक्षा जास्त माया आढळल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.