पनवेल येथे पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक; कोन येथून घेतले ताब्यात, पोलीस तपास सुरू
By नारायण जाधव | Published: September 8, 2022 05:10 PM2022-09-08T17:10:11+5:302022-09-08T17:11:17+5:30
एका घरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवीन पनवेल: तालुक्यातील कोन येथील घरत आळीतील एका घरात बेकायदेशीर वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक करून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी गुरुवारी दिली.
जुली बेगम खादी मुल गाजी (वय ३७), शंपा बेगम शाहिदुल शेख (वय २५ ), नादीरा इर्शाद शेख (वय ३३), रोजीना खातून झाकीर मंडल (वय ३०) या चार महिला व सोहेल अली मोहम्मद अली शेख (वय २५ ) अशी त्यांची नावे आहेत. पनवेल परिसरातील अनेक ठिकाणी बांगलादेशी घुसखोर बेकायदेशीरपणे वास्तव्य करीत असल्यास त्यांच्याविषयी तत्काळ माहिती द्यावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सखोल तपास सुरू
या बांगलादेशींनी भारतात कोणत्या मार्गे प्रवेश केला, त्यांना त्याकामी कोणी आणि कशी मदत केली, ज्या घरात त्यांनी वास्तव्य केले हाेते, तेथे आसरा देण्यास कोणी मदत केली, भाडेकरार केला असल्यास पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घेतले हाेते का, येथे ते कोणते काम करीत होते, त्यांना कोणी रोजगार दिला याबाबचा सखोल तपास पोलीस करीत आहेत.