5 कोटी घरात होते, तरी २५ कोटींचे दागिने लुटायला गेला आणि अडकला; तीन मजली इमारतीवरून एवढा मुद्देमाल कसा नेला?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2023 04:17 PM2023-09-29T16:17:34+5:302023-09-29T16:17:54+5:30
लोकेशने यापूर्वीही छोट्या मोठ्या चोऱ्या केल्या आहेत. दिल्लीतील जंगपुरा भागातील भोगल मार्केटमधील उमराव सिंह ज्वेलर्सच्या दुकानात त्याने दरोडा टाकला होता.
दिल्लीच्या एका सोन्याच्या दागिन्यांच्या शोरुमला लुटणारा मास्टरमाईंड लोकेश श्रीवासला पोलिसांनी गजाआड केले आहे. चोरी करणे गुन्हाच आहे, परंतू घरात आधीच्याच चोरीची ५ कोटी रुपयांचा मुद्देमाल घरात असताना त्याहून पाच पट मोठा डल्ला मारण्याची हाव त्याला तुरुंगात घेऊन गेली आहे.
लोकेशने यापूर्वीही छोट्या मोठ्या चोऱ्या केल्या आहेत. दिल्लीतील जंगपुरा भागातील भोगल मार्केटमधील उमराव सिंह ज्वेलर्सच्या दुकानात त्याने दरोडा टाकला होता. लोकेशने छत्तीसगढसह विविध राज्यांत चोरी केली आहे. तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि छत्तीसगडमध्ये त्याच्यावर यापूर्वीच्या चोरीच्या अनेक एफआयआर दाखल आहेत.
त्याने छत्तीसगढमधील दुर्ग जिल्ह्यातील स्मृति नगर पोलीस ठाण्यापासून काही मीटर अंतरावर एका खोली भाड्याने घेतली होती. या काळात बिलासपूर पोलीस कवर्ध्यापासून त्याचा पाठलाग करत होती आणि त्याला भिलाईमध्ये पकडण्यात आले. २०१९ मध्ये त्याने पारख ज्वेलर्समधून ५ कोटींची चोरी केली होती. दिल्लीमध्येही त्याने त्याच प्रकारे चोरी केली होती. यामुळे पोलिस त्याच्या मागावर होते.
२४ सप्टेंबरला लोकेशने दिल्लीतील शोरुम फोडला होता. ही दिल्लीतील सर्वात मोठी चोरी आहे. एका रात्रीत चोरांनी अख्खा शोरुम पुसून नेला होता. सिक्रेट तिजोरी देखील या चोरट्यांनी फो़डली होती. सकाळी दहा वाजता शोरुम मालक आला तेव्हा त्याच्या पायाखालची वाळूच सरकली होती. स्ट्राँग रुमला भोक पाडण्यात आले होते. त्याने ३० किलो सोन्याच्या दागिन्यांसह करोडोंचे हिरे मोती लंपास केले होते.
तीन मजली शोरुममध्ये लोकेश आणि त्याचे साथीदार छतावरून आत आले होते आणि तिथूनच २५ कोटींचा माल घेऊन पळाले होते. पोलिसांनाही याचे आश्चर्य वाटत होते. पोलीस आता शोरुममधील कर्मचाऱ्यांच्या मागावर आहेत. कारण त्यांच्या माहितीशिवाय एवढी इत्यंभूत माहिती लोकेशला मिळणे अशक्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.