नीट प्रकरणात दोन्ही आरोपींना ५ दिवसांची CBI कोठडी; पालकांनाही आरोपी करण्याची मागणी
By राजकुमार जोंधळे | Published: July 3, 2024 05:25 AM2024-07-03T05:25:50+5:302024-07-03T05:26:23+5:30
आराेपी व सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद झाला. यानंतर न्यायालयाने दाेघांनाही पाच दिवसांची सीबीआय काेठडी सुनावली.
लातूर - नीट गुणवाढसंदर्भातील दाेघा आराेपींना लातूर न्यायालयात मंगळवारी दुपारी हजर करण्यात आले. सीबीआयच्या वतीने न्यायालयाकडे आराेपींना सात दिवसांच्या काेठडीची मागणी करण्यात आली. दरम्यान, आराेपी आणि सरकार पक्षाकडून न्यायालयात युक्तिवाद झाला. त्यानंतर लातूर न्यायालयाने दाेघांना ६ जुलैपर्यंत सीबीआय काेठडी सुनावली.
देशभर सध्याला नीट प्रकरण गाजत आहे. याच काळात लातूर येथील शिवाजीनगर पाेलिस ठाण्यात गणवाढीसंदर्भात नांदेड एटीएसने दिलेल्या तक्रारीनुसार चाैघांविराेधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, यातील मुख्याध्यापक जलीलखाॅ पठाण, शिक्षक संजय जाधव यांना स्थानिक तपास यंत्रणांनी अटक केली. इरण्णा मष्णाजी काेनगलवार हा पाेलिसांच्या तावडीतून निसटला, तर दिल्लीत ठाण मांडून सूत्रे हलविणारा म्हाेरक्या गंगाधर हा सीबीआयच्या ताब्यात असल्याची माहिती समाेर आली आहे.
याप्रकरणात लातुरातील दाेघा आराेपींना २ जुलैपर्यंत पाेलिस काेठडी मिळाली हाेती. दरम्यान, हा तपास आता सीबीआयकडे वर्ग झाला असून, मंगळवारी दुपारी पुन्हा लातूरच्या न्यायालयात जलीलखाॅ पठाण, संजय जाधव यास हजर करण्यात आले. न्यायालयात सीबीआयने पुढील तपासासाठी आराेपींना सात दिवसांच्या काेठडीची मागणी केली. आराेपी व सरकार पक्षाच्या वतीने युक्तिवाद झाला. यानंतर न्यायालयाने दाेघांनाही पाच दिवसांची सीबीआय काेठडी सुनावली.
लातूर न्यायालयात असा झाला युक्तिवाद...
सीबीआय वकिलांनी मांडली बाजू...
१) मंगळवारी सकाळी ११ वाजता लातूर न्यायालयात सीबीआयचे अधिकारी दाखल झाले. त्यांनी स्थानिक तपास यंत्रणाकडून ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांच्या आधारे आपली बाजू मांडली.
२) लातूर पाेलिसांच्या तपासात प्रगती दिसून येत आहे. दरम्यान, उपलब्ध पुराव्याच्या आधारे आम्हाला पुढील तपास करायचा आहे. यासाठी न्यायालयाने आराेपीला सीबीआय काेठडी देण्याची गरज आहे.
३) लातुरात दाखल गुन्ह्यातील इतर आराेपी अद्याप हाती लागले नाहीत. त्यांच्या अटकेसाठी व पुढील तपासासाठी सात दिवसांची सीबीआय काेठडी देण्यात यावी, अशी विनंती न्यायालयाला केली.
४) आराेपींकडून पाेलिसांनी जप्त केलेली अनेक विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे, उत्तपत्रिका सीबीआयकडून न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात आला. यातून या आराेपींचा व इतर राज्यातील आराेपींचा काही संबंध आहे का? याचा तपास करायचा आहे.
५) लातुरातील एकाने आराेपींच्या माेबाइलवर फाेन करून, गुणवाढीसंदर्भात विचारणा केली हाेती. गुणवाढीसाठी काय आणि किती रुपये लागतील. काम झाल्यावर पैसे किती द्यायचे, असा संवाद झाल्याचे न्यायालयात वकिलांनी सांगितले.
६) लातुरातील आराेपींचा संबंध काेठे-काेठे आहे, अधिकच्या तपासासाठी इतर दाेघांना अटक करायची आहे. हा युक्तवाद ग्राह्य धरून न्यायालयाने दाेघांना पाच दिवसांची सीबीआय काेठडी सुनावली.
आराेपीच्या वकिलांनी मांडली बाजू...
१) आराेपी हे कुठल्याही परीक्षा मंडळाचे सदस्य, पदाधिकारी नाहीत. लातूर पाेलिसांनी तपास केला. चाैकशीदरम्यान त्यांचे माेबाइल जप्ते केले, शाळेतील कपाट सील केले. शिवाय, बँक खातेही तपासण्यात आले.
२) देशपातळीवर बहुचर्चित असलेल्या नीट प्रकरणाशी त्यांचा कुठलाही संबंध असल्याचे अद्याप समाेर आले नाही. इतर दाेन आराेपी पाेलिसांच्या ताब्यात नाहीत. आता सीबीआय काेठडीची गरज नाही.
३) केवळ त्यांच्या माेबाइलमध्ये असलेल्या क्रमांकावरून आराेपींचा नीट प्रकरणाशी संबंध जाेडणे याेग्य हाेणार नाही, असा युक्तिवाद आराेपींच्या वकिलांनी केला.
४) स्थानिक तपास यंत्रणांकडे उलब्ध असलेल्या कागदपत्र, जप्त माेबाइल आणि इतर मुद्देमलाच्या आधारावर सीबीआयला तपास करता येणार आहे. यासाठी आराेपींच्या काेठडीची गरज नाही.
५) आराेपींना ज्या पालकांनी पैसे दिले आहेत, त्यांची तपासात नावे समाेर आली तर त्यांनाही आराेपी करण्यात यावे, अशी विनंती न्यायालयाला केली.
६) लातूर पाेलिसांनी याचा तपास केला आहे. आता त्या तपासाच्या आधारे पुढील तपास करता येईल. उद्या आणखी काेणी तरी येईल काेठडी मागेल. मग त्यांनाही काेठडी देणार का? असा युक्तिवाद आराेपींच्या वकिलांनी केला.