५ लाखाची दारू, २ किलो गांजा जप्त, लॉकडाऊनमध्ये सुरु असलेल्या अवैध धंद्यांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2020 08:01 PM2020-05-07T20:01:18+5:302020-05-07T20:07:27+5:30
तळोजा परिसरातून दोन किलो 20 ग्राम गांजा जप्त केला आहे.
नवी मुंबई : लॉकडाऊन असतानाही बेकायदेशीररित्या मद्यविक्री करणाऱ्या सात ठिकाणांवर गुन्हे शाखा पोलिसांनी कारवाई केली आहे. त्याशिवाय तळोजा परिसरातून दोन किलो 20 ग्राम गांजा जप्त केला आहे.
मागील अनेक दिवसांपासून शहरात छुप्या मार्गाने मद्यविक्री सुरु आहे. त्याकरिता सोशल मीडियासह वेगवेगळ्या मार्गांचा वापर केला जात होता. दरम्यान गुन्हे शाखा पोलिसांकडून शहरातील अवैध धंद्यांचा शोध घेऊन कारवाईसाठी पथके तयार करण्यात आली होती. त्यानुसार उपायुक्त प्रवीणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या विविध पथकांनी सात ठिकाणी छापे टाकून 4 लाख 91 हजार रुपयांची दारू जप्त केली आहे. त्यामध्ये देशी विदेशी दारूचा समावेश आहे. याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्याचप्रमाणे तळोजा येथे मोठ्या प्रमाणात गांजा विक्रीसाठी आणला जाणार असल्याची देखील माहिती गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाला मोळालेली. त्यानुसार पथकाने त्याठिकाणी सापळा रचून रमझानहुसेन अब्दूलजलील खान (26) याला अटक केली आहे. त्याच्याकडून दोन किलो 20 ग्राम गांजा जप्त करण्यात आला आहे. शहरात अद्यापही अनेक ठिकाणी छुप्या मार्गाने अमली पदार्थ विकले जात असल्याची शक्यता आहे. अशा ठिकाणांचा देखील गुन्हे शाखेकडून शोध घेतला जात आहे.