खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2024 06:39 AM2024-11-01T06:39:06+5:302024-11-01T06:39:28+5:30
गणेश सरोडी ऊर्फ डॅनी ऊर्फ दादा (६७), प्रदीप यादव (४०), मनीष भारद्वाज (४४), रॅमी फर्नांडिस (५८) आणि शशिकांत यादव (४३) अशी आरोपींची नावे आहेत.
मुंबई : बांधकाम व्यावसायिकांना खंडणीसाठी धमकावणाऱ्या अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीच्या पाच जणांना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. गणेश सरोडी ऊर्फ डॅनी ऊर्फ दादा (६७), प्रदीप यादव (४०), मनीष भारद्वाज (४४), रॅमी फर्नांडिस (५८) आणि शशिकांत यादव (४३) अशी आरोपींची नावे आहेत.
या खंडणीप्रकरणात राजनचा खास हस्तक आणि पत्रकार जे. डे. हत्या प्रकरणातील आरोपी रोहित जोसेफ ऊर्फ सतीश काल्या याचाही सहभाग असून खंडणीविरोधी पथक अधिक तपास करत आहे. विशेष म्हणजे पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरलेल्या सतीश कालिया याची पॅरोलवर सुटका झाली होती.
पालघरची रहिवासी असलेल्या ५८ वर्षीय महिलेने तिचे वांद्रे येथील १,३०० चौरस मीटरचे मालमत्ता क्षेत्र एका बांधकाम व्यावसायिकाला विकले होते. मालमत्ता तपासणीसाठी गेले असता व्यावसायिकाला तेथे पॉलसन आणि कालिया भेटले. पॉलसनने धमकी देत १० कोटीची मागणी केली होती.
तक्रारीनंतर तत्काळ कारवाई
खंडणीची मागणी होत असल्याची तक्रार खंडणी विरोधी पथकाकडे आल्यानंतर पोलिस निरीक्षक अरुण थोरात यांच्या नेतृत्वातील पथकाने तपास सुरू केला.
तपासात कुख्यात छोटा राजन टोळीचा सहभाग समोर आला. आरोपींनी व्यावसायिकाकडे १० कोटी खंडणीची मागणी केली होती. तडजोडीअंती तीन कोटी रुपये देण्याचे ठरले होते. छोटा राजन टोळी सक्रिय झाल्याने पोलिसांनी सरोडी याच्यासह प्रदीप यादव, भारद्वाज, फर्नांडिस, शशिकांत यादव यांना बेड्या ठोकल्या.