दरोडाच्या तयारीत असलेल्या पाच जणांना पकडले; रिसोड पोलिसांची तत्परता, एक दरोडेखोर फरार
By संतोष वानखडे | Published: September 12, 2022 08:18 PM2022-09-12T20:18:11+5:302022-09-12T20:18:48+5:30
अंधाराचा फायदा घेत एक दरोडेखोर फरार होण्यात यशस्वी झाला.
रिसोड (वाशिम) : रिसोड तालुक्यातील भापूर शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारी असलेल्या पाच जणांना रिसोड पोलिसांनी मोठ्या शिताफीने पकडल्याची घटना १२ सप्टेंबरला पहाटे तीन वाजतादरम्यान घडली. अंधाराचा फायदा घेत एक दरोडेखोर फरार होण्यात यशस्वी झाला.
शहर व ग्रामीण भागात चार वाहनांद्वारे रात्रीची पेट्रोलिंग करण्यात येते. १२ सप्टेंबर रोजी पहाटे २ वाजतादरम्यान पेट्रोलिंग दरम्यान वाशिम- बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीवर रिसोड पोलीस स्टेशन अंतर्गत काही इसम दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलीस कर्मचारी एकाडे यांना मिळाली. या माहितीवरून पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर यांनी तत्काळ भापूर शिवारात शोध मोहीम सुरू केली. यादरम्यान भापूर गावाच्या शिवारात दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले ६ इसम हे एका वाहनामध्ये संशयास्पद स्थितीत दिसून आले. पोलिसांना पाहून दरोडेखोर पळून जात असताना, पाठलाग करुन पाच जणांना पकडण्यात आले.
अंधाराचा फायदा घेत एक दरोडेखोर फरार होण्यात यशस्वी झाला. या आरोपींवर वाशिम, मेहकर, डोणगाव, जानेफळ पोलीस स्टेशन येथे गुन्हे दाखल असुन ते सराईत गुन्हेगार असल्याचे सांगण्यात येत आहे. आरोपींविरूद्ध भादंवी कलम ३९९, ४०२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक बच्चन सिंह, अपर पोलीस अधीक्षक गोरख भामरे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनीलकुमार पुजारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकूर, सपोनि गायकवाड, कर्मचारी एकाडे, मुकाटे, अंभुरे, सरकटे यांनी केली.
चाकू, तलवार जप्त
आरोपींच्या ताब्यातून एक चाकू, लोखंडी तलवार, दोरी, दोन लोखंडी पाईप, मिरची पूड व एक तवेरा वाहन जप्त करण्यात आले.