बांधकाम व्यावसायिकाच्या वडिलांचे अपहरण करुन २ कोटींची खंडणी मागणाऱ्या ५ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2019 12:52 PM2019-11-15T12:52:25+5:302019-11-15T12:57:22+5:30
दीड कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले़.
पुणे : मार्केटयार्डमधील बांधकाम व्यावसायिकांच्या वडिलांचे अपहरण करून दीड कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांना गुन्हे शाखेच्या पथकाने सिनेस्टाईल पाठलाग करुन पकडले़. रात्रभर सुरु असलेल्या या मोहिमेत आरोपींना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे़.
याबाबतची माहिती अशी, एका बांधकाम व्यावसायिकांच्या ६५ वर्षांच्या वडिलांचा मार्केटयार्डमध्ये व्यापारी गाळा आहे़. मार्केटयार्डमधील दुकान बंद करुन ते रात्री घरी जात होते़. यावेळी गुन्हेगारांनी मार्केटयार्ड येथील वखार महामंडळासमोरुन अपहरण केले़. त्यानंतर त्यांनी मुलाच्या मोबाईलवर फोन करुन दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली़. ती दिली नाही तर वडिलांना जीव मारण्याची धमकी दिली़. त्यांनी अपहरणाची ही माहिती तातडीने गुन्हे शाखेला दिली़ याची माहिती मिळताच गुन्हे शाखेची ५ ही पथके तातडीने कामाला लागली़.
गुन्हेगारी मध्यरात्री एका ठिकाणी पैसे आणून देण्यास सांगितले होते़. त्यानुसार एका बॅगेत पैसे ठेवून ती बॅग तेथे ठेवण्यात आली़. यावेळी पोलीस सभोवताली पाळतीवर होते़. मात्र, गुन्हेगारांनी पैशाची बॅग घेऊन धुम ठोकली़ त्यानंतर पोलिसांनी त्यांचा पाठलाग करुन पैसे घेण्यासाठी आलेल्यांना पकडले़. त्यांच्याकडे केलेल्या चौकशीतून त्यांच्या आणखी काही साथीदारांची नावे निष्पन्न झाली़. त्यांना शहरातील वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले आहे़. आतापर्यंत पोलिसांनी ५ जणांना ताब्यात घेतले असून अधिक तपास सुरु आहे.
...............
गुन्हेगारांनी खंडणीचे दीड कोटी रुपये मिळाल्यानंतर या व्यापाऱ्यांना पुणे सातारा रोडवरील केळवडे येथे गाडीतून सोडून देऊन ते पसार झाले़. त्यानंतर त्यांनी तेथून जाणाऱ्या माणसांकडे विचारपूस केली़. त्या माणसाच्या मोबाईलवरुन आपल्या मुलाला फोन करुन माहिती दिल्यानंतर त्यांना तेथून तातडीने घरी आणण्यात आले़.