बोगस मृत्यू प्रमाणपत्राद्वारे ५० लाख लाटण्याचा प्रयत्न; पुण्यातील जोडप्यावर मुंबईत गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2022 06:56 AM2022-10-10T06:56:36+5:302022-10-10T06:56:54+5:30
कंपनीच्या दावा विभागाने कागदपत्रांची पडताळणी केली आणि ती सर्व कागदपत्रे बोगस असल्याचे आढळून आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोटक लाईफ इन्शुरन्स कंपनीकडे बोगस मृत्यू प्रमाणपत्र आणि इतर कागदपत्रे सादर करून ५० लाख रुपये विम्याची रक्कम लाटण्याचा अयशस्वी प्रयत्न करण्यात आला. याप्रकरणी पुण्यातील एका जोडप्यावर दिंडोशी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या जोडप्याने एक खोटी कथा रचली होती. ज्यात विमाधारक पती म्हणजे आरोपीचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. पोलीस अहवालासह कागदपत्रांची पडताळणी करताना विमा कंपनीला कागदपत्रे बोगस असल्याचे आढळून आले. कोटक लाईफ इन्शुरन्सने शुक्रवारी दिलेल्या तक्रारीच्या आधारे दिंडोशी पोलिसांनी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. तक्रारीनुसार आरोपी प्रकाश रामचंद्र माने (३६) यांने यावर्षी जानेवारी महिन्यात कंपनीच्या वेबसाईटवरून २५ लाखांचा ई-टर्म प्लॅन घेतला होता. अपघाती मृत्यू झाल्यास त्याने २५ लाखांचे अतिरिक्त संरक्षणदेखील घेतले होते. ज्यात मानेचा मृत्यू झाल्यास त्याची पत्नी मयुरी ही जीवन विमा पॉलिसीचा एकमेव लाभार्थी (नॉमिनी) निर्देशित केले होते. मयुरीने १५ मार्च रोजी विमा कंपनीला माहिती दिली की, तिच्या पतीचा ६ मार्च २०२२ रोजी रस्ता अपघातात मृत्यू झाला आणि त्यानुसार ५० लाखांच्या विम्याच्या रकमेसाठी दावा केला. तिच्या अर्जासोबत मयुरीने तिच्या पतीच्या मृत्यू प्रमाणपत्राची छायाप्रत, पोस्टमार्टम रिपोर्ट, चौकशी पंचनामा, स्पॉट पंचनामा, गुन्हा यांसारखी संबंधित कागदपत्र सादर केली होती. तपशील फॉर्म, गावातील पोलीसपाटील यांनी दिलेले प्रमाणपत्र आणि माने यांच्या वडिलांनी पुणे जिल्ह्यातील सासवड पोलीस ठाण्यात दिलेले निवेदन याचाही समावेश होता.
...आणि फसवणूक उघड झाली
“कंपनीच्या दावा विभागाने कागदपत्रांची पडताळणी केली आणि ती सर्व कागदपत्रे बोगस असल्याचे आढळून आले. आरोपी जोडप्याने आमच्या कंपनीची फसवणूक करण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट झाले,” असे तक्रारदाराने दिंडोशी पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी माने आणि त्यांच्या पत्नीविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. पुढील तपास सुरू आहे.