Crime News : पोलीस कर्मचाऱ्याकडेच मागितले 50 लाख, अलिबागची घटना, खंडणीचा गुन्हा झाला दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 06:20 AM2021-10-24T06:20:41+5:302021-10-24T06:21:07+5:30

Crime News : लाच मागणाऱ्यांना जेलची हवा खायला लावणाऱ्या याच विभागातील कर्मचाऱ्याकडे खंडणी मागितल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.

50 lakh demanded from police personnel, Alibag incident: Ransom case registered | Crime News : पोलीस कर्मचाऱ्याकडेच मागितले 50 लाख, अलिबागची घटना, खंडणीचा गुन्हा झाला दाखल

Crime News : पोलीस कर्मचाऱ्याकडेच मागितले 50 लाख, अलिबागची घटना, खंडणीचा गुन्हा झाला दाखल

Next

रायगड : अलिबाग येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कार्यालयात घुसून पोलीस हवालदाराला धमकी देत ५० लाख रुपयांची खंडणी  मागितल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी अलिबाग पाेलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कार्यरत आहे.  लाच मागणाऱ्यांना जेलची हवा खायला लावणाऱ्या याच विभागातील कर्मचाऱ्याकडे खंडणी मागितल्याने चांगलीच खळबळ उडाली आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे कार्यालय पिंपळभाट येथे आहे. १७ सप्टेंबर २१ राेजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कार्यालयात आरोपीने काहीही काम नसताना प्रवेश करीत संबंधित पोलीस फिर्यादी यांना ‘मला तुझी नोकरी घालवायची आहे. तुझी सगळी माहिती मी काढली आहे.  जमिनीच्या व्यवहारामध्ये एक काेटी रुपये घेतले आहेस. त्यातील मला ५० लाख दे’, नाही तर तुझी चौकशी करायला लावून कारवाई करायला सांगताे.’ 
त्यावर फिर्यादी यांनी, ‘मी काय म्हणून पैसे देऊ, मी काेणाकडूनही एवढी माेठी रक्कम घेतलेली नाही. मी एकही पैसा देणार नाही,’ असे सांगितले. याचा राग येऊन आरोपी हा फिर्यादीच्या अंगावर मारण्यासाठी गेला. त्यावेळी तिथे असलेल्या पोलीस कर्मचारी सहकार्याने हस्तक्षेप करून प्रकरण साेडवले. त्यानंतर शिवीगाळ आणि धमकी देत आराेपी रिक्षातून निघून गेला. 
या आधीही आराेपी हा २० मे २०२१ राेजी फिर्यादीच्या घरी गेला हाेता. फिर्यादी तेथे हजर नसताना त्यांच्या घरी जात त्यांच्या पत्नी आणि मुलाला धमकावत, ‘तुझ्या  वडिलांना ५० लाख रुपये द्यायला सांग नाही तर ऑफिसमध्ये जाऊन बदनामी करून नोकरी घालवून वाट लावेन,’ अशी धमकी दिली. या घटनेने विभागात खळबळ उडाली आहे.

फिर्यादीच्या घरामध्ये केली आरडाओरड
फिर्यादीच्या घरी आला असता त्यांच्यासोबत आरडाओरड करीत ‘बिनशेती प्रकरणात तू घेतलेल्या एक कोटीपैकी ५० लाख रुपये मागितले. त्यावर माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. तुम्ही ज्यांचे बिनशेतीचे काम केले आहे, त्यांच्याकडूनच पैसे घ्या,’ असे सांगितले आणि ‘माझ्याकडे एवढी मोठी रक्कम नाही. यापुढे तुम्ही माझ्या घरी पैसे मागायला येऊ नका नाही तर तुमच्यावर कायदेशीर कारवाई करीन,’ असे सांगितले हाेते. सातत्याने असे प्रकार हाेत असल्याने फिर्यादीने अलिबाग पाेलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

Web Title: 50 lakh demanded from police personnel, Alibag incident: Ransom case registered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.