नागपुरात जमिनीच्या वादात डॉक्टरला मागितले ५० लाख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 11:35 PM2020-01-29T23:35:08+5:302020-01-29T23:39:51+5:30

कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करून डॉक्टरला ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. बेलतरोडी पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे डॉक्टरने या प्रकरणाची पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. पोलीस आयुक्तांनी निर्देश दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.

50 lakh sought from doctor in Nagpur in land dispute | नागपुरात जमिनीच्या वादात डॉक्टरला मागितले ५० लाख

नागपुरात जमिनीच्या वादात डॉक्टरला मागितले ५० लाख

Next
ठळक मुद्देहल्ला करून जमीन बळकावण्याचा प्रयत्नहुडकेश्वर पोलिसांची संशयास्पद भूमिका, पोलीस आयुक्तांनी फटकारल्यामुळे झाली कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोट्यवधी रुपयांच्या जमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न करून डॉक्टरला ५० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचे प्रकरण उजेडात आले आहे. बेलतरोडी पोलिसांच्या संशयास्पद भूमिकेमुळे डॉक्टरने या प्रकरणाची पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली. पोलीस आयुक्तांनी निर्देश दिल्यानंतर पोलिसांनी कारवाई केली आहे.
धंतोली येथील रहिवासी डॉ. इंदर गुंडेचा यांची हुडकेश्वर ठाण्याच्या परिसरात १६०२४ चौरस फूट जमीन आहे. १९६७ मध्ये डॉ. गुंडेचा यांच्या वडिलांनी ही जमीन खरेदी केली होती. त्यानंतर या जमिनीवर डॉ. गुंडेचा यांचा ताबा आहे. जमिनीच्या जवळ एक खासगी सोसायटी आहे. २००० मध्ये सोसायटीने आपल्या मालकीचे सर्व प्लॉट विकले. काही दिवसांपासून एका नेत्यासह परिसरातील सात-आठ जण गुंडेचा यांच्याशी वाद घालत आहेत. ते विक्री झालेले प्लॉट डॉ. गुंडेचा यांच्या जमिनीवर असल्याचा दावा करीत आहे. डॉ. गुंडेचा यांनी त्यांना सीटी सर्व्हे, नासुप्र आणि इतर शासकीय विभागाने जारी केलेले कागदपत्रांवर रजिस्ट्रीत दाखविलेल्या प्लॉटशी त्यांच्या जमिनीचा संबंध नसल्याचे सांगितले. त्यानंतर गुंडेचा यांची डोकेदुखी वाढली. त्यांना ५० लाखाची मागणी करण्यात येऊ लागली. दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना धमकी देणे सुरू झाले. डॉ. गुंडेचा यांच्या तक्रारीनुसार ते आपल्या जमिनीवर येताच त्यांना पैशांसाठी धमकी दिली जाऊ लागली. प्रतिसाद न दिल्यामुळे २५ जानेवारीला रात्री उशिरा असामाजिक तत्त्वांनी डॉ. गुंडेचा यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्याला धमकी देऊन सूचना फलकाला आग लावली. २६ जानेवारीला गुंडेचा यांनी हुडकेश्वर पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी कारवाई करण्याचे सोडून दोन्ही पक्षांना नोटीस जारी केली. डॉ. गुंडेचा २७ जानेवारीला सकाळी धार्मिक कार्यासाठी भद्रावतीला जाणार होते. त्यांना आपण जाताच पोलिसांच्या मदतीने जमिनीचा ताबा घेण्याचा संशय आला. त्यांनी बाहेरगावी जाण्याची सूचना देऊन हुडकेश्वर पोलिसांना सतर्क केले. ते रवाना होताच दुपारी असामाजिक तत्त्वांनी हल्ला करून गुंडेचा यांचे सूचना फलक तोडून आग लावली. सुरक्षा कर्मचाऱ्याला धमकी देऊन जमिनीवर ताबा मिळविण्याचा प्रयत्न केला. याची माहिती मिळताच गुंडेचा यांनी त्वरित नियंत्रण कक्षाला सूचना दिली. बेलतरोडी ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. त्यांच्यासमोर असामाजिक तत्त्व तोडफोड करीत होते. डॉ. गुंडेचा यांनी त्वरित नागपूरला येऊन हुडकेश्वर ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी कोणतीच कारवाई न करता डॉ. गुंडेचा यांनाच प्रश्न विचारणे सुरु केले. त्रस्त होऊन डॉ. गुंडेचा यांनी बुधवारी सकाळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांना या प्रकरणाची माहिती दिली. पोलीस आयुक्तांनी याबाबत पोलिसांना फटकारले. डॉ. गुंडेचा यांनी झोन चारच्या पोलीस उपायुक्त निर्मला देवी यांची भेट घेऊन त्यांनाही याची माहिती दिली. त्यांनी या प्रकरणाचा तपास करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले. डॉ. गुंडेचा यांच्या मते त्यांनी जमिनीची मालकी आणि त्यावर ताबा मिळविण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पुरावे देऊनही हुडकेश्वर पोलिसांनी कारवाई केली नाही. पोलीस आयुक्तांनी हस्तक्षेप केल्यानंतर पोलिसांची वागणूक बदलली. त्यांनी प्रकरणाचा बारकाईने तपास केल्यास असामाजिक तत्त्वांसोबत हुडकेश्वर पोलिसांची जवळीक असल्याचा खुलासा होणार असल्याचा दावा केला आहे. हुडकेश्वरचे निरीक्षक राजकमल वाघमारे दोन दिवसांपासून हे प्रकरण हाताळत आहेत. परंतु त्यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी बाहेर असल्याचे सांगून माहिती देण्याचे टाळले.

हुडकेश्वर परिसरातील वातावरण तापले
काही दिवसांपासून हुडकेश्वर ठाण्याच्या परिसरातील वातावरण तापले आहे. पिपळा गावात गणराज्य दिनानिमित्त आयोजित सभेत दोन गटात मारहाण झाली. त्यानंतर पाच तासानी माजी सरपंच किशोर वानखेडे यांच्या कार्यालयावर हल्ला करून तोडफोड करण्यात आली. या घटनेच्या तीन दिवसानंतरही हल्ल्यातील आरोपींना हुडकेश्वर पोलिसांनी पकडले नाही. घटनेनंतर पिपळात तणावाचे वातावरण आहे. पोलिसांनी घटनेचे पुरावे शोधण्यासाठी वानखेडे यांचे कार्यालय गाठले. पोलिसांच्या भूमिकेमुळे हुडकेश्वर ठाण्याच्या परिसरात अप्रिय घटना घडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Web Title: 50 lakh sought from doctor in Nagpur in land dispute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.