उमेदवारी रद्द झाल्याचे सांगत आमदाराकडे मागितले ५० लाख; दिल्लीच्या दोन खंडणीखोरांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2024 10:31 AM2024-10-26T10:31:25+5:302024-10-26T10:32:08+5:30
गुन्हे शाखेने तातडीने नवी दिल्लीत जाऊन दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या
लोकमत न्यूज नेटवर्क, नाशिक: मी पंतप्रधान कार्यालयाचा प्रधान सचिव असून, तुम्हाला विधानसभेचे तिकीट मिळवून देतो, असे सांगून चक्क ५० लाखांची खंडणी नाशिकमधील भाजपच्या आमदाराकडेच मागण्यात आली. याबाबत संबंधित आमदारांनी पोलिसांना कळवताच गुन्हे शाखेने तातडीने नवी दिल्लीत जाऊन दोघा संशयितांना बेड्या ठोकल्या.
अहमदनगर व ठाणे जिल्ह्यातील सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनाही अशाच स्वरूपाचे फोन केल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. सर्वेश मिश्रा ऊर्फ शिवा (रा. गाजियाबाद, उत्तर प्रदेश) व गौरवनाथ (रा. नवी दिल्ली) अशी आरोपींची नावे असून त्यांना २८ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
‘उमेदवारी यादीत नाव नाही, तिकिटासाठी पैसे द्या’
- आलेला फोन फसवणूक करणारा असल्याचे लक्षात घेताच संबंधित आमदारांनी सरकारवाडा पोलिस ठाणे गाठले. आचारसंहिता लागण्यापूर्वी हा फोन ६ ऑक्टोबरला आला होता. प्रत्यक्ष कोणत्याही उमेदवाराचे नाव न घेता या भामट्याने नाशिकसह इतर ठिकाणचे तिकीट (उमेदवारी) रद्द झाल्याचे सांगितले होते.
- भामट्याचे धारिष्ट्य इतके, की त्यांनी एका पत्राचे वाचन करीत त्यात उमेदवारी यादीत तुमचे नाव नाही, असे सांगितले आणि विधानसभेचे तिकीट पाहिजे असल्यास ५० लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगून पैशाची मागणी केली.