लोकसभेचे तिकीट मिळवून देण्याच्या नावाखाली नेत्याला 50 लाखांना लुटलं; 22 वर्षीय आरोपी अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2023 01:57 PM2023-03-27T13:57:23+5:302023-03-27T13:58:13+5:30
कॉल स्पूफिंगच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे.
नवी दिल्ली: दिल्लीपोलिसांच्या स्पेशल सेलने कॉल स्पूफिंगच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या चार ठगांना अटक केली आहे. यांनी एका बड्या नेत्याला 2024 मध्ये लोकसभेचे तिकीट मिळवून देण्याच्या नावाखाली 50 लाख रुपयांना लुटल्याची माहिती समोर आली आहे. आरोपी बड्या अधिकार्यांव्यतिरिक्त, राज्याच्या मुख्यमंत्री कार्यालयाच्या नंबरवरुन स्पूफिंगद्वारे कॉल करायचे.
आरोपींनी यासाठी स्पूफिंग अॅपचा वापर केला. आधी ते बड्या अधिकाऱ्यांचे आणि नेत्यांचे मोबाइल नंबर काढायचे आणि नंतर मुख्यमंत्री कार्यालयाचा नंबर काढून अॅपच्या माध्यमातून त्यांना फोन करायचे. समोरच्या व्यक्तीला मुख्यमंत्री कार्यालयाचा नंबर दिसायचा. अशाच प्रकारे एका नेत्याला विश्वासात घेऊन आरोपींनी 50 लाख रुपयांना लुटलं. नेत्याकडून पैसे घेतल्यानंतर आरोपींनी ते पैसे क्रिप्टो करन्सीमध्ये बदलले आणि नंतर आपल्या व्हॉलेटमध्ये सेव्ह केले. पोलिसांनी आरोपींकडून जप्त केलेल्या व्हॉलेटमध्ये US$ 59,000 आढळून आले आहेत.
असा झाला खुलासा
काही दिवसांपूर्वी आरोपींनी एका आयपीएस अधिकाऱ्याला फोन करुन तीन बदल्या झाल्याची माहिती दिली, पण आयपीएस अधिकाऱ्याला संशय आला आणि त्यांनी चौकशी केली. हा फोन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून आला नसल्याचे त्यांना समजले. यानंतर, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने या प्रकरणी आयटी कायद्याच्या कलम 66 सी, गुन्हेगारी कटाच्या कलम 120 ब यासह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर 22 वर्षीय हिमांशू सिंग, जस्टिन मोहनलाल परेरा, दशरथ मकवाना आणि लखनऊ येथील नरेश कुमार यांना अटक केली.