एक लिटर मिश्रित केमिकलमध्ये ५० लिटर दूध तयार; पोलिस तपासात उघड
By दत्ता यादव | Published: July 2, 2023 09:16 PM2023-07-02T21:16:07+5:302023-07-02T21:16:58+5:30
पोलिसांच्या तपासात निष्पन्न; लाखो लिटर भेसळयुक्त दूध विकले
सातारा: दूध भेसळ करणाऱ्या टोळीचा एलसीबीने पर्दाफाश केल्यानंतर अनेक धक्कादायक माहिती तपासात समोर येत आहे. एक लिटर मिश्रित केमिकलमध्ये तब्बल ५० लिटर दूध तयार केले जात होते. केमिकल मिसळून तयार केलेले हे दूध आरोग्यासाठी धोकादायक असून, आतापर्यंत किती लोकांनी हे दूध सेवन केले. याची माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे. दूध भेसळप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे.
बजरंग पांडुरंग जाधव (रा. खराडे, ता. कऱ्हाड, जि. सातारा), गणेश सुनील पनासे (रा. हेळगाव, ता. कऱ्हाड, जि. सातारा), सोमनाथ रंगराव कदम (रा. गायकवाडवाडी, ता. कऱ्हाड), शरद वामन घार्गे, सचिन शंकर यादव, गणेश सुभाष मसुगडे (तिघेही रा. नवीन कवठे, ता. कऱ्हाड), अर्जुनकुमार श्रीकांत गाैतम, विवेककुमार श्रीरामचंद्र गौतम, अजयकुमार गाैतम (तिघेही रा. उत्तर प्रदेश) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कऱ्हाड तालुक्यातील मसूर परिसरामध्ये नवीन कवठे, हेळगाव, खराडे, केंजळ या ठिकाणी संकलन केलेल्या दुधामध्ये भेसळ सुरू असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक अरुण देवकर यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसह शनिवारी रात्री तेथे जाऊन छापा टाकला. या छाप्यामध्ये पोलिसांनी नऊ जणांना अटक केली तर त्यांच्याकडून चार वाहनेही पोलिसांनी जप्त केली.
एलसीबीचे पोलिस अंमलदार सुधीर बनकर, अतिष घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, शरद बेबले, साबीर मुल्ला, लक्ष्मण जगधने, मंगेश महाडिक, सचिन साळुंखे, लैलेश फडतरे, प्रवीण फडतरे, हसन तडवी, राकेश खांडके, पृथ्वीराज जाधव, मोहसिन मोमीन आदींनी या कारवाईत भाग घेतला.
अशी केली जात होती भेसळ..
व्हाईट लिक्विड, सोडीयम बाय कार्बोनेट, पिरॅमिट पावडर, रिफाइंड सोयाबीन हे केमिकल एक लिटर पाण्यामध्ये मिसळल्यानंतर त्यातून तब्बल ५० लिटर दूध तयार केले जात होते. जेव्हा या ठिकाणी छापा टाकण्यात आला तेव्हा पोलिसांना ९ हजार लिटर भेसळयुक्त दूध आढळून आले. म्हणजे आतापर्यंत लाखो लिटर भेसळयुक्त दूध विकले असल्याची शक्यता आहे.