बांग्लादेशात छापल्या 500 च्या नोटा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2021 05:19 AM2021-03-04T05:19:33+5:302021-03-04T05:19:47+5:30
एकाला अटक : एक १ लाख ८५ हजारांचे चलन जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : भारतीय चलनाच्या १ लाख ८५ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा सोमवारी जप्त करण्यात आल्या आहेत. बांग्लादेश येथून मालदामार्गे या नोटा नवी मुंबईत विक्रीसाठी आणल्या होत्या. याप्रकरणी नोटा घेऊन आलेल्या सलीम अली असरील हकल (वय ३०) याला ताब्यात घेण्यात आले असून त्याने यापूर्वी लाखो रुपयांच्या नोटा चलनात आणल्या असल्याची शक्यता आहे.
या घटनेमुळे बांग्लादेश येथून पुरवठा होणाऱ्या भारतीय चलनाच्या बनावट नोटा राज्यभरात वापरात आणल्या जात असल्याचे समोर आले आहे. तळोजा येथील एका व्यक्तीकडे भारतीय चलनाच्या बनावट नोटा असल्याची माहिती गुन्हे मध्यवर्ती शाखेचे सहायक निरीक्षक गंगाधर देवडे यांना मिळाली होती. याबाबत त्यांनी वरिष्ठांना माहिती दिली असता बनावट ग्राहक तयार करण्यात आले होते. या ग्राहकाला भेटून नोटांचा व्यवहार करण्यासाठी एकजण सीबीडी येथे येणार होता.
त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक निवृत्ती कोल्हटकर, सहायक निरीक्षक गंगाधर देवडे, ज्ञानेश्वर भेदोडकर आदींच्या पथकाने सीबीडी रेल्वेस्थानक आवारात सापळा रचला होता. यावेळी नोटा घेऊन आलेल्या सलीम अली असरील हक (वय ३०) ला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे एक लाख रुपयांच्या ५०० च्या बनावट नोटा आढळल्या.
त्याच्या तळोजा येथील घरावर टाकलेल्या छाप्यात ८५ हजारांच्या ५०० च्या नोटा आढळून आल्या. हक हा मूळचा पश्चिम बंगालमधील मालदा येथील राहणारा आहे. त्याला बांग्लादेशमधून भारतात विक्रीसाठी या बनावट नोटा पुरविण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. त्यानुसार या नोटा घेऊन तो नवी मुंबई परिसरात निम्म्या किमतीत विक्रीसाठी ग्राहक शोधत होता. त्याने यापूर्वी लाखो रुपयांच्या बनावट नोटा चलनात आणल्याची शक्यता आहे.
नोटांची हुबेहूब छपाई
जप्त केलेल्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा या हुबेहूब खऱ्या नोटांप्रमाणे आहेत. केवळ पेपरचा दर्जा काहीसा हलका असल्याने अत्यंत बारकाईने पाहिल्यास त्या ओळखल्या जाऊ शकतात. त्यामुळे भारतीय चलनाच्या तंतोतंत मिळत्याजुळत्या बनावट नोटा पाहून पोलीसही थक्क झाले आहेत.