चोरांची अनोखी शक्कल, चक्क ५०० टन लोखंडी पूल गायब; गावकऱ्यांनी डोक्यावर हात मारला
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2022 03:39 PM2022-04-09T15:39:43+5:302022-04-09T15:40:07+5:30
मजेशीर बाब म्हणजे चोरांनी सिंचन विभागातील कर्मचाऱ्यांकडूनच हा पूल कापला आणि गाड्यांमध्ये भरून घेऊन गेले.
आजपर्यंत तुम्ही अनेक चोरीचे किस्से ऐकले असतील. बातम्या वाचल्या असतील किंवा बॉलिवूड सिनेमात चोरीच्या घटनांची दृश्यही पाहिले असतील. परंतु बिहारच्या रोहतास जिल्ह्यात झालेल्या एका चोरीने प्रशासनाची झोप उडवली आहे. या अजब चोरीचा किस्सा सगळीकडे मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून पोलीस या घटनेतील चोरांना पकडण्याचा प्रयत्न करत आहेत.
याठिकाणी बनावट अधिकारी बनून आलेल्या चोरांनी ३ दिवसांत ६० फूट लांब आणि ५०० टन वजनी लोखंडी पूलच चक्क गायब केल्याचा प्रकार घडला आहे. मजेशीर बाब म्हणजे चोरांनी सिंचन विभागातील कर्मचाऱ्यांकडूनच हा पूल कापला आणि गाड्यांमध्ये भरून घेऊन गेले. हा सर्व कारनामा दिवसाढवळ्या घडला आणि कुणालाही चोरीची जराही भनक लागली नाही. परंतु घडलेल्या चोरीच्या प्रकारामुळे प्रशासनही थक्क झाले आहे. हे संपूर्ण प्रकरण नसरीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अमियावरचे आहे. येथे १९७२ च्या सुमारास आरा कॅनॉल कालव्यावर लोखंडी पूल बांधण्यात आला होता. चोरट्यांनी चतुराईने तीन दिवसांत हा पूल कापला आणि नंतर त्याचे लोखंड ट्रकमध्ये भरून तेथून छू मंतर झाले. हा पूल तोडण्यासाठी बुलडोझर, गॅस कटरचाही वापर करण्यात आला.
संपूर्ण गाव आणि स्थानिक कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात धुळफेक
चोरट्यांनी एवढ्या हुशारीने ही घटना घडवली की, गावकऱ्यांपासून ते स्थानिक कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वच नकळत चोरांच्या फसवणुकीत बळी पडले. पाटबंधारे विभागाचे अधिकारी म्हणून त्यांनी गावात पोहोचून विभागीय आदेशाचे पालन करून पुल कापण्याचे काम सुरू केले. अशाप्रकारे सुमारे ६० फूट लांब आणि १२ फूट उंचीचं लोखंड चोरीला गेला. ही बाब उघडकीस आल्यानंतर कनिष्ठ अभियंता अर्शद कमान शमसी यांनी सांगितले की, चोरांविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चोरांनी लढवली शक्कल
चोरी सुद्धा डोकं लावतात असे म्हणतात. चोरट्यांनी त्याचा वापर केला. वास्तविक, लोखंडी पूल जीर्ण झाला होता, त्यामुळे त्याला समांतर काँक्रिटचा पूल विभागाच्या वतीने बनवण्यात आला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी अनेकवेळा लोखंडी पूल काढण्यासाठी अर्ज केला होता. या अर्जाचा सहारा घेत चोरट्यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या अर्जानंतर विभागीय आदेशानुसार पूल काढण्यासाठी आलो आहे. असं सांगत सर्व लोखंड घेऊन पसार झाले.