प्रीती मेनन यांच्याविरुद्ध ५० हजारांचे जामीनपात्र वॉरंट
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2018 08:03 PM2018-11-12T20:03:45+5:302018-11-12T20:04:08+5:30
दुसरीकडे वारंवार गैरहजर राहत असल्याने आप नेत्या प्रीती मेनन यांच्यावर ५० हजाराचे जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले.
जळगाव - माजी मंत्री एकनाथ खडसे व भाजपाची बदनामी केल्याप्रकरणी दाखल खटल्यात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज सोमवारी मुक्ताईनगर न्यायालयात उपस्थिती दिली. दुसरीकडे वारंवार गैरहजर राहत असल्याने आप नेत्या प्रीती मेनन यांच्यावर ५० हजाराचे जामीनपात्र वॉरंट काढण्यात आले.
खडसे यांच्यावर खोटे आरोप केले व पक्षाची बदनामी केली म्हणून भाजपा कार्यकर्ते रमेश ढोले यांनी मुक्ताईनगर न्यायालयात फौजदारी खटला (नं. १६५/१६) दाखल केला आहे. अंजली दमानिया व प्रीती शर्मा -मेनन या खटल्याच्या सुनावणीदरम्यान वारंवार गैरहजर राहत होत्या. यावर दमानिया यांच्याविरुध्द ३० हजार रुपयांचे जामीनपात्र वॉरंट १२ आॅक्टोबर रोजी बजावले होते. यावर खटल्यात प्रत्यक्ष हजर राहण्याचे हमीपत्र दमानिया यांनी पोलिसांकडे सादर केले. त्याप्रमाणे दमानिया आज न्यायालयात हजर झाल्या.
सहा जिल्ह्यात आपल्याविरुद्ध बदनामीचे २७ खटले दाखल असल्याने दर दिवसाआड एका न्यायालयात हजर राहावे लागते, यामुळे तारखेवर हजर राहण्यास कायम स्वरूपी सूट मिळावी, अशी विनंती त्यांच्यावतीने करण्यात आली. यावर याचिकाकर्त्यांचे वकील अॅड.विजय पाटील यांनी आपले म्हणणे मांडण्यास मुदत मागितली. येत्या ५ जानेवारी रोजी खटल्याचे पुढील कामकाज होणार आहे.