वृद्ध कॅप्टनचा ई-मेल हॅक करून काढले ५० हजार
By ऑनलाइन लोकमत | Published: September 1, 2020 03:42 AM2020-09-01T03:42:21+5:302020-09-01T03:42:35+5:30
गावदेवी परिसरात राहणारे कॅप्टन अशोक बत्रा यांची यात फसवणूक झाली आहे. सेवानिवृत्तीतून मिळालेल्या पैशांतून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात बँकेला ई-मेल करून ते पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत होते.
मुंबई : गावदेवी येथील ७९ वर्षीय कॅप्टनचा ई-मेल हॅक करून बँकेतून तब्बल ५० हजार ५०० रुपये काढल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात रविवारी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
गावदेवी परिसरात राहणारे कॅप्टन अशोक बत्रा यांची यात फसवणूक झाली आहे. सेवानिवृत्तीतून मिळालेल्या पैशांतून त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे. लॉकडाऊनच्या काळात बँकेला ई-मेल करून ते पैसे ट्रान्सफर करण्यास सांगत होते. त्यानुसार बँक कर्मचारी त्यांच्याशी संपर्क करून पैसे पुढे पाठवत असे. १८ आॅगस्ट रोजी बँकेतून ५० हजार ५०० रुपये काढल्याचा संदेश मोबाइलवर धडकला. त्यांनी याबाबत बँकेकडे चौकशी केली.
तेव्हा अधिकृत ई-मेल आयडीवरून मेल आल्यानंतर हे पैसे पाठविल्याचे त्यांनी सांगितले. शिवाय लॉकडाऊनमुळे कर्मचारी कमी असल्याने कॉल केला नसल्याचे सांगितले.
चौकशीत दिल्लीतील प्रकाश इंटरप्राईजेस या नावाने असलेल्या बँक खात्यात हे पैसे गेल्याचे समोर आले. त्यामुळे कोणीतरी ई-मेल हॅक करून हा व्यवहार केल्याचे स्पष्ट होताच त्यांनी याबाबत गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा नोंदवला आहे.