औषध निरीक्षकाकडे सापडले ५२ लाखांचे घबाड, सीबीआयकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 27, 2022 06:01 AM2022-07-27T06:01:00+5:302022-07-27T06:01:33+5:30
सीबीआयकडून अटक; १३ लाख ९० हजारांची रोकड जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : केंद्रीय आरोग्य मंत्रालयांतर्गत असलेल्या केंद्रीय औषध मानक नियंत्रण (सीडीएससीओ) या संस्थेत कार्यरत एका औषध निरीक्षकाकडे त्याच्या उत्पन्न स्त्रोतापेक्षा तब्बल १५४ टक्के अधिक मालमत्तेचे घबाड सापडले आहे.
सीबीआयने या निरीक्षकाच्या घरी केलेल्या छापेमारीत १३ लाख ९० रुपयांची रोख रक्कम सापडली आहे. या छापेमारीत औषध निरीक्षक आणि त्याच्या पत्नीच्या नावे विविध बँकांतील आणि सरकारी योजनांतील ठेवी, अशी एकूण ५२ लाख ९५ हजार ९७५ रुपयांची मालमत्ताही सापडली आहे.
अहमदाबाद येथे औषध निरीक्षक आणि वैद्यकीय उपकरण अधिकारी या पदावर पराग गौतम हे कार्यरत आहे. त्याने व्यापारी जिनिश पटेल यांच्याकडून मालखरेदीसाठी साडेतीन लाख रुपयांची लाच मागितली. याप्रकरणी पटेल यांनी सीबीआयकडे तक्रार केल्यानंतर गौतम याला लाच स्वीकारताना अटक केली.
स्वयंपाक सुविधांवर लाखोंचा खर्च
गौतम याने घरातील स्वयंपाक सुविधांवर २३ लाख खर्च केले. तर, त्याच्या पत्नीच्या नावे उत्तर प्रदेश येथे भूखंड असल्याचेही कागदपत्रांवरून दिसून आले, तर छाप्यादरम्यान १४ हजार १०० रुपये किमतीच्या चांदीच्या वस्तू आणि ४ लाख ८२ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिनेही सापडले. या दागिन्यांच्या खरेदीचा कोणताही स्त्रोत गौतम याला सांगता आला नाही.
वार्षिक उत्पन्नापेक्षा अधिक मालमत्ता
गौतम याला अटक केल्यानंतर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी त्याच्या घरी छापेमारी केली. या छापेमारीत त्यांना मोठे घबाड सापडले. या छापेमारीत गौतम आणि त्याच्या पत्नीच्या नावे विविध बँकांतील आणि सरकारी योजनांतील ठेवी अशी एकूण ५२ लाख ९५ हजार ९७५ रुपयांची मालमत्ता सापडली आहे. त्याच्या वार्षिक उत्पन्नापेक्षा त्याच्याकडे सापडलेली मालमत्ताही सुमारे १५४ टक्के जास्त आहे.