नवी मुंबईत वर्षभरात 5,332 जणांनी खाल्ली ‘कोठडीची हवा’, वेगवेगळ्या गुन्ह्यांत अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: February 2, 2021 12:54 AM2021-02-02T00:54:59+5:302021-02-02T00:56:07+5:30
Crime News : पोलिसांनी वर्षभरात विविध गुन्ह्यांत एकूण ५३३२ जणांना तुरुंगाची हवा दाखवली आहे. त्यामध्ये सर्वाधिक गुन्हेगारांना खारघर पोलिसांकडून अटक झाली आहे. पोलिसांकडून पकडण्यात आलेल्यांमध्ये अनेक सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.
- सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : पोलिसांनी वर्षभरात विविध गुन्ह्यांत एकूण ५३३२ जणांना तुरुंगाची हवा दाखवली आहे. त्यामध्ये सर्वाधिक गुन्हेगारांना खारघर पोलिसांकडून अटक झाली आहे. पोलिसांकडून पकडण्यात आलेल्यांमध्ये अनेक सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.
नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात वाढती गुन्हेगारी नियंत्रणात आणण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. त्यात सराईत गुन्हेगारांकडून नियोजनबद्ध केले जाणारे गुन्हे तसेच उद्भवलेल्या परिस्थितीमुळे ऐनवेळी घडलेल्या गुन्ह्यांचा समावेश आहे. अशा गुन्ह्यांची उकल करून दोषींना अटक करण्यासाठी पोलिसांना कौशल्य पणाला लावावे लागते.
त्यानुसार मागील वर्षभरात घडलेल्या अशा अनेक गुन्ह्यांत पोलिसांनी कामगिरी सिद्ध करून दाखविली आहे. त्यानुसार वर्षभरात विविध गुन्ह्यांतील तब्बल ५ हजार ३३२ जणांना पोलीस कोठडीची हवा खावी लागली आहे. त्यात काही जुन्या गुन्ह्यांतील आरोपींचाही समावेश आहे. पोलिसांकडून
तपासात राहिलेल्या सातत्यामुळे गतवर्षात ते पोलिसांच्या हाती लागले आहेत.
गतवर्षात परिमंडळ एक मध्ये २ हजार ४२४ आरोपींना, तर परिमंडळ दोनमध्ये २ हजार ९०८ आरोपींना अटक झाली आहे. त्यात सर्वाधिक ६१४ जणांना खारघर पोलिसांनी कोठडी दाखविली आहे.
लॉकडाऊनदरम्यान मे ते जुलैचा कालावधीत केवळ काही प्रमाणात आरोपींची पकड ढिली झाली होती. संशयित आरोपी पकडताना त्याला कोरोनाची लागण नाही ना ? याची चिंता पोलिसांना होती. तर एपीएमसी पोलिसांनी पकडलेल्या एकाला कोरोना झाला असल्याचे त्याला कोठडीत डांबल्यानंतर समोर आले होते. त्यामुळे या कालावधीत आरोपींची धरपकड काही प्रमाणात मंदावली होती.
मात्र, ऑगस्टनंतर पुन्हा पोलिसांनी घडलेल्या गुन्ह्यांच्या व जुन्या गुन्ह्यांच्या तपासावर जोर देत आरोपी अटकेवर भर दिला. त्यामध्ये घरफोडी, वाहनचोरी, हत्या, मारामारी अशा अनेक गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारदेखील पोलिसांच्या हाती लागले आहेत. त्यामुळे अधिकाधिक गुन्हेगार अटक करून गुन्हेगारी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून झाला आहे.
ऑगस्टनंतर पुन्हा पोलिसांनी घडलेल्या गुन्ह्यांच्या व जुन्या गुन्ह्यांच्या तपासावर जोर देत आरोपी अटकेवर भर दिला. त्यामध्ये घरफोडी, वाहनचोरी, हत्या, मारामारी अशा अनेक गुन्ह्यांतील सराईत गुन्हेगारदेखील पोलिसांच्या हाती लागले आहेत.