सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांच्या खाली लपवलेली 5.51 लाखांची दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2021 05:59 PM2021-02-03T17:59:27+5:302021-02-03T17:59:37+5:30
अबकारी खात्याकडून मोले चेक नाक्यावर कारवाई
मडगाव: सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांच्या खाली लपवून मोठ्या प्रमाणावर आंध्रप्रदेशात होणारी दारूची तस्करी मोले चेक नाक्यावर अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दाखविलेल्या हुशारीमुळे उघडकीस येऊ शकली. या प्रकरणात अबकारी खात्याने 5.51 लाखांची बेकायदेशीर दारू जप्त केली असून आंध्रप्रदेशात नोंद असलेला एक ट्रकही ताब्यात घेतला आहे.
बुधवारी पहाटे पावणे दोनच्या सुमारास ही घटना घडली. हुबळी मार्गाने आंध्रप्रदेशात जाण्यासाठी चेक नाक्यावर एक ट्रक आला असता रात्रपाळीच्या अबकारी कर्मचाऱ्यानी ट्रक चालकाला हटकले असता ट्रकात सिमेंटच्या रिकाम्या पिशव्या असल्याचे नोंद केलेली कागदपत्रे त्याने दाखविली.
अबकारी उपनिरीक्षक जितेंद्र आडपईकर याना संशय आल्याने त्यांनी ट्रकची तपासणी करण्यास सांगितले. यावेळी आरटीओच्या नाक्यावर गाडीची कागदपत्रे आहेत ती घेऊन येतो असे सांगून ट्रक चालक पुढे गेला आणि काळोखाचा फायदा घेत फरार झाला.अबकारी कर्मचाऱ्यांनी ट्रक उघडून पाहिले असता सिमेंटच्या या रिकाम्या पिशव्यांच्या ढिगाऱ्याखाली रॉयल स्टेग, मॅकडोवेल्स, आणि रियल व्हिस्कीचे एकूण 305 कार्टून्स लपवून ठेवलेले आढळून आले.
या कारवाईत एकूण 5.51 लाखांची दारू जप्त करण्यात आली असून एपी 39- टीडी 1629 क्रमांकाचा ट्रक जप्त केला आहे. ही कारवाई सांगेचे अबकारी निरीक्षक रोहित देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जितेंद्र आडपईकर, अबकारी गार्ड सुनील नाईक, महादेव गावकर, दशरथ गावस, आशिष गावकर तसेच सहाय्यक गार्ड दीपक प्रभुदेसाई यांनी केली.