उमेश कोल्हे हत्या प्रकरणी ६ जणांना अटक, ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 2, 2022 05:12 PM2022-07-02T17:12:11+5:302022-07-02T17:39:58+5:30
Umesh Kolhe Murder Case : थेट गृहमंत्री अमित शहा यांनीच ट्विट करुन या घटनेची दखल घेतल्याचे सांगितले आहे.
अमरावती : गेल्या २१ जून रोजी गळा कापून झालेल्या व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांच्या हत्या प्रकरणातील ‘फॅक्ट’ शोधण्यासाठी राष्ट्रीय तपास संस्था असलेल्या एनआयएची चार ते पाच सदस्यीय चमू अमरावतीत दाखल झाल्याची माहिती आहे. याप्रकरणी अमरावती शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून याचा तपास एनआयएची टीम करत आहे. पोलिसांनी या प्रकरणी सहा आरोपींना अटक केली असून मुदस्सीर अहमद उर्फ सोनू रजा वल्द शेख ईब्राहिम (२२), अब्दुल तौफिक उर्फ नानू शेख तसलीम (२४), शाहरूख पठाण उर्फ बादशाह हिदायत खान (२५), शोएब खान उर्फ भुऱ्या वल्द साबीर खान (२२), अतिब रशीद वल्द आदील रशीद (२२), युसूफ खान बहादूर खान (४४) अशी अटक आरोपींची नावे आहेत. या आरोपींना कोर्टात हजर केले असता त्यांना कोर्टाने ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
थेट गृहमंत्री अमित शहा यांनीच ट्विट करुन या घटनेची दखल घेतल्याचे सांगितले आहे. अटक केलेले सहा आरोपी अमरावती येथील आहेत. ‘उदयपूरच का? महाराष्ट्रातील अमरावतीमध्ये उदयपूरसारखी घटना घडून एका फार्मासिस्टची निर्घृण हत्या करण्यात आली,’ असे ट्विट आमदार नीतेश राणे यांनी केल्याने येथील उमेश कोल्हे हत्याप्रकरण नव्याने चर्चेत आले. येथील उमेश कोल्हे यांची २१ जून रोजी रात्री गळ्यावर वार करून हत्या करण्यात आली होती. ही हत्या नूपुर शर्मा वादाशी संबंधित आहे का, याचा काटेकोर तपास करावा, अशी मागणी भाजपचे प्रदेश प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी केली होती. त्या अनुषंगाने शहर पोलिसांनी तपासही केला. मात्र, कोल्हे यांच्या हत्येचा नूपुर शर्मा प्रकरणाशी संबंध नसल्याचा निर्वाळा अमरावतीच्या पोलीस आयुक्त डॉ. आरती सिंह यांनी दिला. त्यानंतर, आता महाराष्ट्र सरकारने हा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे दिला आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून अमरावतीतील कोल्हे खून प्रकरणाचा तपास NIA कडे सोपविण्यात आल्याचे सांगितले. या हत्याप्रकरणाचे कट-कारस्थान, हत्येच्या मागे असेलेल्या संघटना आणि आंतरराष्ट्रीय संबंधांचा तपास करण्यात येईल, असेही अमित शहा यांनी गृहमंत्रालयाच्या ट्विट अकाऊंटवरुन सांगितले आहे.
नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याने हत्या
व्हेटर्नरी मेडिकल व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा यांचे समर्थन केल्याने झाली असल्याचा आरोप उमेश यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. राजस्थानमधील उदयपूर शहरातील धनमंडी पोलीस स्टेशन हद्दीतील मालदास स्ट्रीट येथे भरदिवसा तीन जणांनी एका व्यक्तीचा गळा चिरून खून केला. मृत तरुणाच्या 8 वर्षाच्या मुलाने नुपूर शर्माच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट केल्याचे सांगितले जात आहे. याचा राग येऊन आरोपीने वडिलांची निर्घृण हत्या केली.