बापरे! तब्बल ६ कोटींचे ड्रग्स पोटात लपवले; कस्टम अधिकारीही बघून चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2022 07:46 PM2022-04-20T19:46:50+5:302022-04-20T19:47:17+5:30
Drug Case : कस्टम अधिकार्यांनी 6 कोटींहून अधिक किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे
नवी दिल्ली - दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमाशुल्क विभागाच्या पथकाने हेरॉईन तस्करीच्या एका मोठ्या प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे. कस्टम अधिकार्यांनी 6 कोटींहून अधिक किमतीचे हेरॉईन जप्त केले आहे, जे पावडरच्या स्वरूपात कॅप्सूलमधून आणले होते. या प्रकरणी सीमाशुल्क विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी सांगितले की, युगांडाच्या नागरिकालाही अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर एनडीपीएस कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. अटक केल्यानंतर सीमाशुल्क पथकाने आरोपीची ९ दिवस चाचणी केली आणि त्यानंतर पोटातून ९९ कॅप्सूल बाहेर आल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, अटक केलेला युगांडाचा हवाई प्रवासी ३० मार्च रोजी शारजाहमार्गे भारताकडे रवाना झाला होता. दुसऱ्या दिवशी 31 मार्चला ते इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल 3 वर पोहोचले. ग्रीन चॅनल ओलांडल्यावर तिथे उपस्थित कस्टम टीमने त्याची आणि त्याच्या सामानाची झडती घेतली. मात्र काहीही संशयास्पद आढळले नाही.
9 दिवसांच्या वैद्यकीय तपासणीनंतर पोटातून 99 कॅप्सूल बाहेर आल्या
त्याची वैद्यकीय चाचणी केली असता त्याच्या शरीरात संशयास्पद पदार्थ असल्याचे आढळून आले. त्यानंतर ९ दिवसांच्या वैद्यकीय तपासणीनंतर त्याच्या पोटातून ९९ कॅप्सूल सापडले. त्यापैकी ९२१ ग्रॅम पांढरी पावडर आढळून आली. ही पांढरी पावडर हिरोईन असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर या विमान प्रवाशाविरुद्ध एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. अटक करण्यात आली, आता पुढील तपास सुरू आहे. यापूर्वीही अशा तस्करीच्या घटना घडल्या आहेत का, याचाही शोध घेतला जात आहे.