होम लोनच्या नावाखाली बँकेला ६ कोटींचा गंडा; कल्याणला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 07:58 AM2022-10-12T07:58:38+5:302022-10-12T07:58:47+5:30
फसवणुकीची रक्कम सहा कोटींपेक्षा जास्त असल्याने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : येथील नामांकित बँकेला होम लोनच्या नावाखाली सहा कोटी ३० लाख १७ हजारांचा गंडा घातल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या फसवणूक प्रकरणात एजंट, कर्जदार, कंपनी आणि बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. प्रकरणाचा तपास आर्थिक गुन्हे शाखकडे देण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, एजंटने २६ जणांच्या नावे दोन कंपन्या स्थापन केल्याचे भासवत कंपन्यांतील २६ अर्जदारांना होम लोन हवे, असल्याचे दर्शविले. त्यासाठी त्यांना बिल्डर हवे होते. त्यांनी बिल्डरांनाही सोबत घेतले. कंपनीनेही संबंधितांशी संगनमत करून तसा अहवाल तयार करण्यास मदत केली. कजर्दारांना बँकेकडून सहा कोटी ३० लाख १७ हजार रुपयांचे कर्ज मंजूर केले. मात्र कजर्दारांकडून हप्ते फेडले जात नसल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आले. फसवणुकीची रक्कम सहा कोटींपेक्षा जास्त असल्याने तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे.
बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप
एजंट उमेश भाईप, कोरवी ॲग्रो कंपनीचे संचालक कोकरे, क्रॅक्स रिस्क मॅनेज कंपनीचे संचालक आणि कर्ज घेणारे २६ अर्जदार यांच्यासह सिद्धीविनायक, साईराज, साई सृष्टी आणि संस्कृती या चार बिल्डरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कर्ज मंजुरीसाठी बनावट कागदपत्रे सादर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तसेच संगनमताने खोटा अहवाल तयार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.