6 वर्षाची चिमुकली शाळेसाठी गेली ती परत आलीच नाही, गोणीत आढळला मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2022 05:20 PM2022-07-13T17:20:05+5:302022-07-13T20:28:05+5:30
Murder Case : याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला असता तिचा मृतदेह गोणीत आढळून आला.
उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथे घरातून बेपत्ता असलेल्या एका 6 वर्षीय मुलीचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मुलीच्या वडिलांनी सांगितले की, त्यांची मुलगी शाळेत जाण्यासाठी घरून निघाली होती आणि परत आलीच नाही. त्यांनी तिचा सर्वत्र शोध घेतला, पण ती सापडली नाही. याप्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी मुलीचा शोध सुरू केला असता तिचा मृतदेह गोणीत आढळून आला.
हे प्रकरण कल्याणपूरच्या दौलतपूर गावचे आहे. फतेहपूरचे एसपी राजेश सिंह यांनी सांगितले की, वडिलांनी पोलिस ठाण्यात मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेत मुलीचा शोध सुरू केला. बरीच शोधाशोध केल्यानंतर गावातीलच एका घरातून निष्पापाचा मृतदेह सापडला. मुलीचा मृतदेह गोणीत भरलेला होता. डोक्यावर जखमा आढळल्या.
पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. पोलिसांनीही बलात्काराची भीती व्यक्त केली आहे. मात्र, अहवाल आल्यानंतरच याची माहिती समोर येणार आहे. याप्रकरणी तीन संशयितांनाही ताब्यात घेण्यात आले असून, त्यांची चौकशी सुरू आहे. पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी दुसरीची विद्यार्थिनी होती आणि गावातीलच प्राथमिक शाळेत शिकत होती. मंगळवारी सकाळी 10 वाजता ती शाळेसाठी घरून निघाली. मात्र, घरी परतली नाही. मुलीच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. एवढ्या लहान मुलीवर एवढं क्रौर्य कोण करू शकतं, असं कुटुंबीय म्हणत आहेत.