गोव्यातील दारूचा ६० लाखांचा साठा जप्त; राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2022 09:20 PM2022-06-05T21:20:25+5:302022-06-05T21:20:32+5:30
दारू तसेच वाहन असा एकूण ८७ लाख ६० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच चालक जयकिसन ढाका आणि सुजानाराम बिष्णोई यांना अटक केली.
पिंपरी : गोवा राज्य निर्मित व केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेले विदेशी मद्याचा साठा घेऊन जाणाऱ्या दोन कंटनेरवर कारवाई करून ५९ लाख ६० हजार ४०० रुपयांचे विदेशी मद्य जप्त केले. तसेच याप्रकरणी दोन जणांना अटक केली. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मावळ तालुक्यातील सोमाटणे फाटा व तळेगाव टोलनाका येथे रविवारी (दि. ५) ही कारवाई करण्यात आली.
जयकिसन धीमाराम ढाका आणि सुजानाराम जियाराम बिष्णोई (दोघे रा. बाडमेर, राजस्थान) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पिंपरी-चिंचवडचे उपअधीक्षक युवराज शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हे मद्यसाठा घेऊन जाणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. त्यानुसार, मुबंई-बंगळूर महामार्गावर सोमाटणे फाटा बाह्यवळण व तळेगाव टोलनाका या परिसरात सापळा लावण्यात आला. त्यावेळी संशयावरून दोन ट्रक कंटेनरची तपासणी करण्यात आली. गोवा राज्य निर्मित व केवळ गोवा राज्यात विक्रीस असलेल्या विदेशी मद्याचा ५९ लाख ६० हजार ४०० रुपये किमतीचा साठा या ट्रक कंटेनरमध्ये मिळून आला. विदेशी मद्याचे एकूण १००६ बॉक्स मिळुन आले. दारू तसेच वाहन असा एकूण ८७ लाख ६० हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. तसेच चालक जयकिसन ढाका आणि सुजानाराम बिष्णोई यांना अटक केली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तळेगाव दाभाडे येथील निरीक्षक संजय सराफ, दुय्यम निरीक्षक बी. एस. घुगे, एम. आर. राठोड, दीपक सुपे व स्वाती भरणे, कर्मचारी भागवत राठोड, अक्षय म्हेत्रे, राहुल जौंजाळ, रसुल काद्री, चंद्रकांत नाईक, सुरज घुले, मुंकूंद पोटे, जयराम काचरा यांच्या पथकाने ही कारवाई केली.