महा ई-सेवा केंद्र, 'आपले सरकार'ची वेबसाइट हॅक करून ६३ प्रतिज्ञालेख काढले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 10:14 AM2020-05-26T10:14:23+5:302020-05-26T10:14:46+5:30
पासवर्ड हॅक करून दोन्ही केंद्रांमधून परस्पर ६३ आॅफलाइन प्रतिज्ञालेख काढल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गायगाव : अत्यंत सुरक्षित व महत्त्वपूर्ण असलेली महा ई-सेवा केंद्र ,आपले सरकारची वेबसाइट हॅक करून गायगाव व पारस येथील सेतू केंद्रामधून वॉलेटमधील पैशांचा उपयोग पासवर्ड हॅक करून दोन्ही केंद्रांमधून परस्पर ६३ आॅफलाइन प्रतिज्ञालेख काढल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. दोन्ही संचालकांना आर्थिक फटका बसण्यासोबतच त्यांचे केंद्र अज्ञात व्यक्तीने वापरले. या प्रकरणी उरळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार देण्यात आली असून, अधिक तपासासाठी प्रकरण सायबर सेलकडे पाठविण्यात येणार आहे.
जिल्हा, तालुका व गावोगावी महाआॅनलाइनद्वारे आपले सरकार ,महा ई-सेवा केंद्र नागरिकांसाठी कार्यरत असून, याद्वारे नागरिकांना उत्पन्न, जात, अधिवास, नॉन क्रिमिलेअर आदी दाखले व इतर शासकीय सेवा या केंद्रांमधून आॅफलाइन व आॅनलाइन अशा पद्धतीने पुरविल्या जातात. सोबतच या केंद्रांना सीएससी अर्थात कॉमन सर्व्हिस सेंटर म्हणूनदेखील मान्यता देण्यात आली आहे; मात्र जिल्ह्यातील ही केंद्रे २२ मार्चपासून लॉकडाउनमुळे बंद आहेत.
याचा फायदा अज्ञात टोळीने उठवित अत्यंत सुरक्षित व महत्त्वपूर्ण असलेली महा ई- सेवा केंद्र ,आपले सरकारची वेबसाईट हॅक करून १८ मे रोजी गायगाव येथील केंद्रातून ३५ व पारस येथील सेतू केंद्रामधून २८ वॉलेटमधील पैशांचा उपयोग करीत दोन्ही केंद्रांमधून परस्पर ६३ आॅफलाइन प्रतिज्ञालेख काढल्याची घटना उघडकीस आली. सेतू केंद्रांचा आयडी व पासवर्ड ट्रेस करून ही दोन्ही केंद्रे अज्ञात व्यक्ती किंवा टोळीने हॅक केली; मात्र सध्या जिल्ह्यातील सर्वच सेतू केंद्रे बंदच असल्यामुळे आणखी किती केंद्रांमध्ये हा प्रकार घडला असेल हे तूर्तास तरी समजू शकत नाही; मात्र अनेकांची फसगत झाल्याची शक्यता असून, या टोळीने संपूर्ण राज्यात असला प्रकार करून नागरिकांना बोगस प्रमाणपत्र देण्यासोबतच लाखो रुपयांवर डल्ला मारण्याची शक्यता नाकारता येत नाही. या प्रकरणी सेतू केंद्र चालक ज्ञानेश्वर शेंडे यांनी उरळ पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
गायगाव येथील सेतू केंद्र हॅक करून अज्ञात व्यक्तीने काढलेल्या प्रतिज्ञालेखाबाबतची घटना गंभीर आहे. केंद्र संचालकांनी रीतसर तक्रार आम्हाला दिली आहे. हा प्रकार सायबर गुन्हा असून, अधिक तपासासाठी प्रकरण सायबर सेलकडे पाठविण्यात आले आहे.
- विलास पाटील,
ठाणेदार, उरळ पोलीस स्टेशन
गायगाव व पारस येथील केंद्र हॅक झाल्याची घटना गंभीर स्वरूपाची आहे. जिल्ह्यात इतर केंद्रांबाबतही हा प्रकार घडला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. जिल्ह्यातील सर्व केंद्रचालकांना त्वरित पासवर्ड बदलविण्याचा आदेश देण्यात आला आहे. अजूनही काही केंद्र हॅक झाले असल्यास चालकांनी आपल्या हद्दीतील पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी.
- चंचल मुजुमदार, जिल्हा व्यवस्थापक, महा आॅनलाइन, अकोला