बापरे! PNBच्या लॉकरमधील 65 लाखांचे दागिने गेले चोरीला, बँक कर्मचाऱ्यांविरुद्ध FIR
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2022 09:32 PM2022-03-03T21:32:25+5:302022-03-03T21:33:14+5:30
Jewelery Stolen : आता बँक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गाझियाबादच्या थाना सिहानी गेट परिसरात असलेल्या पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत गैरव्यवहाराचे अनोखे प्रकरण समोर आले आहे. बँकेच्या लॉकरमध्ये ठेवलेल्या सुमारे 65 लाखांच्या दागिन्यांवर कोणीतरी हात साफ केला, मात्र त्याची माहितीही कुणाला लागली नाही. याबाबत बँक कर्मचारीही अनभिज्ञ राहिले. आता बँक कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
खरे तर अशोक नगर येथील रहिवासी असलेल्या प्रियंका गुप्ता यांचे सिहानी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेहरू नगर भागातील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत गेल्या 20 वर्षांपासून खाते उघडलेले आहे. प्रियंका गुप्ता यांनी त्यांचे दागिने सुरक्षितता म्हणून या बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते, ज्याची किंमत सुमारे 65 लाख रुपये आहे.
प्रियांकाने 2019 मध्ये शेवटच्या वेळी लॉकरचा वापर केला होता, त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये लॉकर उघडण्यासाठी तिने बँकेशी संपर्क साधला तेव्हा तिची चावी सापडली नसल्याने तिचे लॉकर उघडता आले नाही. यानंतर बँक कर्मचारी आणि व्यवस्थापकाने तुम्हाला लवकरच कळवण्यात येईल, असे सांगून संपर्क क्रमांक देऊन त्यांना पाठवले. प्रियंका गुप्ता यांच्याशी सलग दोन-तीन वेळा संपर्क साधूनही उत्तर न मिळाल्याने हे लॉकर फोडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर बँक कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत हे लॉकर फोडण्यात आले. लॉकर फोडले तेव्हा प्रियंका गुप्ता यांची झोपच उडाली. लॉकरमध्ये ठेवलेल्या त्यांच्या मौल्यवान वस्तू गायब होत्या.
पिवळ्या कापडात गुंडाळलेल्या काही वस्तू उरल्या होत्या. लॉकरमध्ये ठेवलेले सुमारे 65 लाख रुपयांचे दागिने गायब झाले होते, त्यानंतर प्रियंका गुप्ता यांनी गाझियाबादमधील सिहानी गेट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. आम्ही गुन्हा दाखल केला असून कारवाई सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. साहजिकच, लोक त्यांच्या मौल्यवान वस्तूंसाठी त्यांच्या घरापेक्षा बँकेचे लॉकर अधिक सुरक्षित मानतात. आता बँकेच्या लॉकरमधून मौल्यवान वस्तू गायब होऊ लागल्या, तर लोकांचा बँकांवरचा विश्वास उडणार हे साहजिकच आहे. मात्र, २०१९ पासून या शाखेत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.