मेहुल चोक्सीकडून ४० बँकांना ६,७४७ कोटींचा गंडा, ३ गुन्हे; फरार झाल्यानंतर साडेचार वर्षांनी खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2022 06:23 AM2022-12-17T06:23:11+5:302022-12-17T06:23:42+5:30

सीबीआयकडून प्राप्त माहितीनुसार, मेहुल चोक्सी याच्या गीतांजली, नक्षत्र आणि गिली या तीन प्रमुख कंपन्या आहेत.

6,747 crore scam from Mehul Choksi to 40 banks, 3 crimes; Disclosure after four and a half years of absconding | मेहुल चोक्सीकडून ४० बँकांना ६,७४७ कोटींचा गंडा, ३ गुन्हे; फरार झाल्यानंतर साडेचार वर्षांनी खुलासा

मेहुल चोक्सीकडून ४० बँकांना ६,७४७ कोटींचा गंडा, ३ गुन्हे; फरार झाल्यानंतर साडेचार वर्षांनी खुलासा

googlenewsNext

लाेकमत न्यूज नेटवर्क
 मुंबई : फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सी याने पंजाब नॅशनल बँक, आयसीआयसीआय बँकेसह ४० बँकांना ६७४७ कोटींचा गंडा घातल्याची नवी माहिती उजेडात आली आहे. या नव्या प्रकरणात शुक्रवारी सीबीआयने तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या आधी २०१८ मध्ये मेहुल चोक्सी व त्याचा भाचा नीरव मोदी यांनी पंजाब नॅशनल बँकेला १४ हजार कोटी रुपयांचा गंडा घातला होता. 

सीबीआयकडून प्राप्त माहितीनुसार, मेहुल चोक्सी याच्या गीतांजली, नक्षत्र आणि गिली या तीन प्रमुख कंपन्या आहेत. यापैकी, गीतांजली जेम्स लि. या कंपनीने ५५६४ कोटी ५४ लाख रुपये, नक्षत्र ब्रँडस् लि. या कंपनीने ८०७ कोटी २ लाख रुपये तर गिली इंडिया लि. या कंपनीने ३७५ कोटी ७१ लाख रुपये, असा एकूण ६७४७ कोटी २७ लाख रुपयांचा गंडा या बँकांना घातला आहे. 

प्रामुख्याने हिरे, जडजवाहीर यांची खरेदी, त्यांचे डिझाइन्स व व्यवहार यासाठी हे कर्ज घेतले होते. मात्र, ज्या कारणांसाठी बँकांनी त्याला कर्ज दिले होते त्या कारणासाठी ते पैसे वापरण्याऐवजी हे पैसे त्याने लंपास करत त्याचा वापर वैयक्तिक करणासाठी केल्याचे दिसून आले. या तिन्ही प्रकरणात पंजाब नॅशनल बँकेच्या उपसरव्यवस्थापकांनी २१ मार्च २०२२ रोजी लेखी तक्रार सीबीआयकडे दिली होती. 
त्या तक्रारीच्या छाननीनंतर आता सीबीआयने या तिन्ही प्रकरणांत स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. या तिन्ही प्रकरणात मिळून मेहूल चोक्सी याच्यासह, धनेश सेठ (संचालक, गीतांजली), कपिल खंडेलवाल (सहअध्यक्ष, गीतांजली), चंद्रकांत करकरे (मुख्य वित्तीय अधिकारी, गीतांजली), अनियथ नायर (संचालक, गिली) यांच्यावर देखील गुन्हे दाखल झाले आहेत. 

दरम्यान, गेल्याच महिन्यात सेबीने देखील मेहुल चोक्सी याच्यावर गीतांजलीच्या समभागांच्या किमतीत छेडखानी केल्याप्रकरणी १० वर्षांसाठी बंदी घातली असून त्याला पाच कोटींची दंड ठोठावला आहे. जानेवारी २०१८ पासून सीबीआय मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी यांनी केलेल्या घोटाळ्याचा तपास करत आहे, तर मार्च २०१८ पासून ईडीदेखील या प्रकरणाचा तपास करत आहे.  

सध्या अँटिग्वामध्ये मुक्काम
 मेहुल चोक्सीने जानेवारी २०१८ मध्ये घोटाळा केल्याचे उजेडात आले होते. 
 जानेवारी २०१८ मध्येच तो देश सोडून पळून गेला. सध्या तो अँटिग्वामध्ये आहे. त्यामुळे आता जवळपास साडेचार वर्षांनी नवीन कोणती माहिती पुढे आली? 
 हा नवा घोटाळा आधी कसा उजेडात आला नाहीत? असे प्रश्न निर्माण झाले आहेत.

Web Title: 6,747 crore scam from Mehul Choksi to 40 banks, 3 crimes; Disclosure after four and a half years of absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.