युनियन बँकेला कंपनीने घातला ६८ कोटींचा गंडा; भद्रेश ॲग्रोवर गुन्हा, सीबीआयची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2023 06:58 AM2023-08-08T06:58:11+5:302023-08-08T06:58:30+5:30
कापूस ते कापड अशा व्यापारात असलेल्या या कंपनीने २०१६ साली युनियन बँकेकडून ७५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कर्जप्राप्त रकमेचा अपहार करत युनियन बँकेची ६८ कोटी ९१ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईस्थित भद्रेश ॲग्रो या कंपनी विरोधात सीबीआयने मुंबईत गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी कंपनीचे संचालक भद्रेश मेहता, पार्थ मेहता, हिना मेहता यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे.
कापूस ते कापड अशा व्यापारात असलेल्या या कंपनीने २०१६ साली युनियन बँकेकडून ७५ कोटी रुपयांचे कर्ज घेतले होते. कंपनीच्या कामकाजाचा आणि कार्यक्षेत्राचा विस्तार करण्यासाठी प्रामुख्याने हे कर्ज कंपनीने घेतले होते. प्रत्यक्षात कंपनीच्या संचालकांनी या कर्जाची परतफेड केली नाही व हे पैसे हेतुपुरस्सर वैयक्तिक नावे हडप केल्याचा ठपका सीबीआयने त्यांच्यावर ठेवला आहे. या प्रकरणी घोटाळा झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर बँकेने कंपनीचे फोरेन्सिक ऑडिट केले. या माध्यमातून देखील कंपनीने मोठ्या प्रमाणावर फसवणुकीचे उद्योग केल्याचे निदर्शनास आले. कंपनीचे खाते २०१७ मध्ये थकीत कर्ज खाते म्हणून घोषित करण्यात आले तर २०१८ साली भारतीय रिझर्व्ह बँकेने हे खाते ‘फ्रॉड खाते’ म्हणून घोषित केले आहे.
कर्ज रकमेची हेराफेरी
कंपनीला कर्जापोटी जे पैसे मिळाले ते पैसे कंपनीच्या संचालकांनी आपल्याच परिघातील कंपन्यांत फिरवून नंतर ते पुन्हा आपल्याकडे वळविल्याचे तपासात दिसून आले. कंपनीच्या मालाची मोठ्या प्रमाणावर आवक-जावक केल्याचा जरी दावा कंपनी करत असली तरी त्याच्या कोणत्याही व्यवहाराची कोणतीही नोंद ठेवली नाही. तसेच जो माल व्यवहारासाठी पाठवला होता तो परवाना प्राप्त मालवाहू वाहनातून देखील पाठवला नाही. या माल वाहकाच्या बनावट पावत्यादेखील कंपनीने सादर केल्याचे फोरेन्सिक ऑडिटमध्ये आढळून आले.