वृद्धाच्या बँक खात्यातून ६.८५ लाख परस्पर हडपले; बँकेच्या व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2020 10:25 PM2020-11-28T22:25:22+5:302020-11-28T22:25:56+5:30
Crime News : याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी इर्विन चौकातील इंडसइंड बँकेच्या व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध भादंविचे कलम ४२०,२४ अन्वये गुन्हा शनिवारी नोंदविला.
अमरावती : एका वृद्धाचे बँक खात्याचे चेकबुक व एटीएम स्वत:जवळ ठेवून संगनमताने त्यांच्या खात्यातून ६ लाख ८५ हजार ९९९ रुपये परस्पर काढून फसवणूक केल्याची धक्कादायक घटना इंडसइंड बँकेत १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर दरम्यान घडली. याप्रकरणी सिटी कोतवाली पोलिसांनी इर्विन चौकातील इंडसइंड बँकेच्या व्यवस्थापकासह तिघांविरुद्ध भादंविचे कलम ४२०,२४ अन्वये गुन्हा शनिवारी नोंदविला.
इंडसइंड बँकेचा व्यवस्थापक तसेच निकिता साबळे दोन्ही कार्यरत इंडसइंड बँक अमरावती, प्रवीण उके (रा. न्यू हनुमाननगर), असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी हरिशचंद्र पारगुजी वानखडे (७४ रा. खैरय्यानगर अमरावती) यांनी सिटी कोतवाली ठाण्यात तक्रार नोंदविली होती.
पोलीससूत्रानुसार, फिर्यादीचे इर्विन चौकातील इंडसइंड बँकेत खाते आहे. फिर्यादी यांचा स्वत:च्या मालकीचे ७०० स्केअर फुट प्लॉटमध्ये १० बाय १० च्या स्लॅबची रूम व त्यावर १० बाय १० ची रूम असून त्या प्लॉटमध्ये फिर्यादीला दोन रुमचे नवीन बांधकाम करायचे असल्याने त्यांच्या परिचित असलेला एजंट प्रवीण उके याच्या माध्यमातून घर बांधण्याकरिता ७,०५,९९९ रुपये कर्ज काढून दिले म्हणून फिर्यादीकडून बँक खाते पुस्तक, चेक बुक एटीएम कार्ड जवळ ठेवून घेतले. तीनही आरोपीने संगनमत करून वृद्धाची फसवणूक केली. पुढील तपास पीएसआय राजेंद्र गुलतकर करीत आहेत.