माले मुडशिंगी येथून ६९ गावठी बॉम्ब जप्त, दोन सख्खे भाऊ अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 10:36 PM2019-10-22T22:36:55+5:302019-10-22T22:37:29+5:30
उजळाईवाडी येथील टोलनाक्याजवळील उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटप्रकरणी तपास करीत असताना माले मुडशिंगी येथील दोघा सख्ख्या भावांच्या घरी ६९ गावठी बॉम्ब व साहित्य मिळून आले.
कोल्हापूर : उजळाईवाडी येथील टोलनाक्याजवळील उड्डाणपुलाखाली झालेल्या स्फोटप्रकरणी तपास करीत असताना माले मुडशिंगी (ता. हातकणंगले) येथील दोघा सख्ख्या भावांच्या घरी ६९ गावठी बॉम्ब व साहित्य मिळून आले. संशयित विलास राजाराम जाधव (वय ५२ ) व आनंदा राजाराम जाधव ( ५४) यांना अटक केली. बॉम्ब बनविण्यासाठी वापरलेले साहित्य कोठुन आनले तसेच त्याचा वापर कोठे झाला, त्याची विक्री कोणाला केली. उजळाईवाडी स्फोटासंबधी यांचा काही संबध आहे काय, याबाबत चौकशी सुरु आहे, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक तानाजी सावंत यांनी मंगळवारी दिली.
संशयितांनी भूईबावडा, धुंदवडे (ता. राधानगरी) येथील शेतामध्ये डुकरे मारण्यासाठी या बॉम्बचा वापर करीत होतो. शेतक-यांच्या मागणीनुसार आम्ही बॉम्बची विक्री करीत असल्याची कबुली दिली आहे. उजळाईवाडी येथील स्फोटाचे साहित्य आणि संशयितांकडे मिळून आलेले साहित्य एकाच प्रकारचे आहे. त्यांनी स्फोटके ठेवली होती की ज्यांना विक्री केली त्यांनी ठेवली होती, याबाबत चौकशी सुरु असलेचे निरीक्षक सावंत यांनी सांगितले.
उजळाईवाडी स्फोटामध्ये ट्रकचालक दत्तात्रय गणपती पाटील (रा. न्यू गणेश कॉलनी, जाधववाडी) यांचा हकनाक बळी गेला आहे. विधानसभा निवडणुकीत स्फोट झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. स्थानिक गुन्हे शाखेचे कॉन्स्टेबल संतोष माने, हरिष पाटील यांना खब-याकडून माहिती मिळाली की, माले मुडशिंगी येथील विलास जाधव व आनंदा जाधव हे गावठी बॉम्ब बनवून त्यांची विक्री करतात. त्यांना ताब्यात घेवून दोघांच्या घराची झडती घेतली असता बॉम्ब बनविण्याचे साहित्यासह पांढºया व गडद तपकिरी रंगाचे एकूण ६९ गावठी तयार बॉम्ब असा सुमारे ७ हजार किंमतीचा मुद्देमाल मिळून आला. पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी दोघा संशयितांकडे कसून चौकशी केली. सल्फर, पोर्टशियम पावडर, गारगोटीचे खडे आदी साहित्य वापरुन गावठी बॉम्ब बनवित असलेची कबुली दिली. बॉम्बला रक्तीच्या आवरणाचा वापर करुन रानडुकरांची शिकार करण्यासाठी त्याचा वापर करीत असल्याचे सांगितले.
उजळाईवाडी येथील स्फोटाचे साहित्य अशाचप्रकारे आहे. त्यांचेकडून या साहित्याची विक्री झालेची शक्यता आहे. त्यांनी हे साहित्य उड्डाणपुलाखाली ठेवले होते की अन्य कोणी याबाबत त्यांचेकडे चौकशी सुरु आहे.