राज्यात नऊ महिन्यांत एसीबीचे ६९८ सापळे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2019 08:24 PM2019-10-21T20:24:25+5:302019-10-21T20:28:14+5:30
९४७ आरोपी जाळ्यात: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची माहिती
संदीप मानकर
अमरावती - राज्यात लाचलुचपत प्रतिबंध विभागाने आठही विभागांत कारवाई करून नऊ महिन्यांत ६९८ सापळे यशस्वी केले. अधिकारी, कर्मचारी व खासगी व्यक्ती असे एकूण ९४७ आरोपी जाळ्यात अडकल्याची माहिती एसीबीने दिली आहे. ही कारवाई १ जानेवारी ते १७ ऑक्टोबर या नऊ महिन्यांत करण्यात आली आहे.
राज्यात एसीबी सापळ्यांचा टक्का वाढला आहे. मागील वर्षी संपूर्ण वर्षभरात ८९१ ट्रॅप झाले होते. यंदाही त्यापेक्षा जास्त ट्रॅप होतील, असा विश्वास अधिकाऱ्यांना आहे. त्यामुळे लाचखोर अधिकारी, कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. १ कोटी ५७ लक्ष ५८ हजार ९३५ रुपयांची सापळा रक्कम आहे. लाचखोरीत महसूल विभाग अव्वल स्थानी असून, १६४ सापळे यशस्वी झाले आहेत. दुसरा क्रमांक हा नेहमीप्रमाणे पोलीस प्रशासनाचा आहे. १५७ सापळ्यांमध्ये २१७ आरोपी अडकले आहेत. महावितरणमध्ये ३३ सापळे टाकण्यात आले. महानगरपालिका ३७, नगर परिषद १५, जिल्हा परिषद २९, पंचायत समिती ६४, वनविभाग १६, जलसंपदा विभाग १५, आरोग्य विभाग २२, सहकार व पणन विभाग १४, शिक्षण विभाग २२, प्रादेशिक परिवहन विभागामध्ये १३ तसेच इतर विभागांचाही सापळ्यांमध्ये समावेश आहे.
सर्वाधिक एसीबी ट्रॅप हे पुणे विभागात १४४ झाले असून, १०६ सापळ्यंसह औरंगाबाद विभाग दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुंबई ३०, ठाणे ७४, नाशिक ९८, नागपूर ८१, अमरावती ९६, नांदेड ६९ असे एकूण ६९८ ट्रॅप यशस्वी झाले.
वर्ग-१ चे ४७ अधिकारी अडकले
लाचखोरीत वर्ग-१ चे अधिकारीसुद्धा मागे नाहीत. राज्यात आतापर्यंत या संवर्गातील ४७ अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडले आहेत. वर्ग २ चे ८०, तर सर्वाधिक वर्ग ३ च्या ५६५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. इतर लोकसेवक ५९, तर खासगी व्यक्ती १५३ यांचाही आरोपींमध्ये समावेश आहे.
अपसंपदेची १७ प्रकरणे दाखल
राज्यात ज्या अधिकाऱ्यांकडे अपसंपदा आढळून आली, त्यांच्याविरुद्ध १७ प्रकरणे एसीबीने दाखल करण्यात आले आहे. यामध्ये एकूण ३४ आरोपींचा समावेश असून, ९ कोटी ८८ लाख ८१ हजार ३१ रूपयांची अपसंपदा प्रकरणातील मालमत्ता रक्कम आहे. अन्य भ्रष्टाचाराचीसुद्धा चार प्रकरणे दाखल झाली आहेत. यामध्ये एकूण १० आरोपींचा समावेश आहे.