डॉक्टरला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत ७ कोटींना चुना, तीन महिन्यांत बँक खाते रिकामे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2024 09:12 AM2024-10-31T09:12:35+5:302024-10-31T09:13:56+5:30

सर्व गोपनीय असल्याने कारवाईबाबत कुठेही वाच्यता करू नये, तसेच कुठेही जाण्यापूर्वी परवानगी घेण्याच्या सूचना दिल्या. 

7 crores of lime to the doctor by showing fear of digital arrest, the bank account is empty in three months | डॉक्टरला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत ७ कोटींना चुना, तीन महिन्यांत बँक खाते रिकामे

डॉक्टरला डिजिटल अरेस्टची भीती दाखवत ७ कोटींना चुना, तीन महिन्यांत बँक खाते रिकामे

मुंबई : ‘तुमच्या सिम कार्डचा वापर मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात झाला असून, लवकरच तुम्हाला अटक होणार आहे,’ अशी भीती घालून  मुंबईतील एका ५७ वर्षीय महिला डॉक्टरची जवळपास ७ कोटींना फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘डिजिटल अरेस्ट’च्या जाळ्यात अडकून घाबरलेली महिला डॉक्टर किराणा सामान आणण्यासाठी घराबाहेर पडतानादेखील सायबर ठगांची परवानगी घेत असल्याचे पोलिस तपासात समोर आले. याप्रकरणी सायबर पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरू केला आहे.

मध्य मुंबईत राहणाऱ्या महिला डॉक्टरच्या तक्रारीनुसार, जुलै ते सप्टेंबरदरम्यान ही फसवणूक झाली आहे. सायबर भामट्याने जुलै महिन्यात कॉल करून सिम कार्ड बंद होणार असल्याचे सांगितले. पुढे, पोलिस अधिकारी बोलत असल्याचे सांगून सिम कार्डचा मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यात वापर झाल्याचे सांगून कारवाईची भीती घातली. पुढे सिम कार्डसाठी वापरलेल्या आधार कार्डद्वारे झालेल्या वेगवगेळ्या व्यवहारांचा बनावट लेखाजोखा मांडून डॉक्टरला सीबीआयची खोटी नोटीस पाठवली. सर्व गोपनीय असल्याने कारवाईबाबत कुठेही वाच्यता करू नये, तसेच कुठेही जाण्यापूर्वी परवानगी घेण्याच्या सूचना दिल्या. 

या कालवधीत सीबीआय ऑफिसर समजून सायबर ठगांची प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीसाठी परवानगी घेत डॉक्टर घराबाहेर पडत होत्या. मात्र, आरोपींकडून पैशांची मागणी सुरूच असल्याने त्यांना संशय आला. महिनाभर त्यांनी सर्वांशी संपर्क तोडला. अखेर, फसवणूक झाल्याचे स्पष्ट होताच महिलेने सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. याप्रकरणी सायबर पोलिस अधिक तपास करत आहेत. तसेच नागरिकांनीही अशाप्रकारे सायबर भामट्यांच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन सायबर पोलिसांकडून करण्यात येत आहे.

व्हिडीओ कॉलवर खटल्याची सुनावणी!
व्हिडीओ कॉलवर पोलिस गणवेशात दिसणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे महिलेला त्यांच्यावर विश्वास बसला. पुढे सीबीआय अधिकारी म्हणून राहुल गुप्ता नामक व्यक्तीने महिलेची चौकशी सुरू केली. यादरम्यान, व्हिडीओ कॉलवरच खटल्याची सुनावणी घेण्यात आली. यात पोलिस, न्यायालय पाहून महिला आणखी घाबरली. त्यानंतर बँक खात्याच्या तपासणीसाठी रक्कम ट्रान्सफर करण्यास सांगण्यात आले. तेव्हा त्यांनी तीन महिन्यांत ६ कोटी ९३ लाख रूपये ट्रान्सफर केले.

Web Title: 7 crores of lime to the doctor by showing fear of digital arrest, the bank account is empty in three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.