नर्सिंग होममधील २२ दिवसांच्या बाळाचा सात लाखांत सौदा; उल्हासनगरला डॉक्टरसह पाच जणांना ठोकल्या बेड्या
By सदानंद नाईक | Published: May 19, 2023 09:32 AM2023-05-19T09:32:59+5:302023-05-19T09:33:33+5:30
डॉ. चित्रा चैनानी हिच्यासह या नर्सिंग होममधील दोन सहकारी संगीता व प्रतिभा, मूल विकणारा पुरुष दलाल डेमन्ना आणि एक महिला यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
उल्हासनगर : शहरातील कॅम्प क्रमांक ३ येथील महालक्ष्मी नर्सिंग होममधील अवघ्या २२ दिवसांच्या बाळाची सात लाख रुपयांत विक्री करण्याचा धक्कादायक प्रकार ठाणे क्राईम ब्रँचने उघडकीस आणून पाच जणांना अटक केली. डॉ. चित्रा चैनानी हिच्यासह या नर्सिंग होममधील दोन सहकारी संगीता व प्रतिभा, मूल विकणारा पुरुष दलाल डेमन्ना आणि एक महिला यांना पोलिसांनी ताब्यात घेतले.
महालक्ष्मी नर्सिंग होममधील एका लहान बाळाची विक्री होत असल्याची माहिती ठाणे क्राईम ब्रँचला मिळाल्यावर, त्यांनी बुधवारी ३ वाजता छापा टाकला. लहान मुलाच्या विक्रीचा सौदा होत असल्याची माहिती समाजसेविका सानिया हिंदुजा, राष्ट्रवादीचे सोनू पंजाबी यांना मिळाली होती. त्यांनी ठाणे क्राईम ब्रँचशी संपर्क साधून वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिलीप पाटील, कृष्णा कोकणी, महिला पोलिस तेजश्री शेडके यांना माहिती दिली. महालक्ष्मी नर्सिंग होममध्ये एका महिलेला बनावट ग्राहक बनून पाठवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.
बनावट ग्राहक म्हणून पाठविलेल्या महिलेने, आपल्याला दोन मुली असून मुलगा हवा आहे, असे सांगितल्यावर २२ दिवसांच्या बाळाचा सात लाखांत सौदा झाला. नर्सिंग होमच्या डॉ. चित्रा चैनानी, यांच्या सहकारी संगीता, प्रतिभा आणि बेळगावमधील मूल विकणारा दलाल डेमन्ना आणि मूल विकण्यास तयार झालेली महिला (नाव उघड केलेले नाही) यांना ताब्यात घेण्यात आले.
पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. महालक्ष्मी नर्सिंग होममधून आतापर्यंत किती लहान मुलांची विक्री करण्यात आली, याचा तपास करण्यासाठी १० जणांचे पथक स्थापन केल्याची माहिती कड यांनी दिली. या घटनेने उल्हासनगरात खळबळ उडाली आहे.
बाळांच्या विक्रीचे रॅकेट?
शहरात यापूर्वीही लहान बाळांच्या विक्रीचे प्रकरण गाजले होते. यामध्ये नर्सिंग होमच्या डॉक्टरसह सहकाऱ्यांचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. महालक्ष्मी नर्सिंग होममधून आतापर्यंत काही बाळांची विक्री झाल्याची चर्चा सुरू आहे. याचा तपास सुरू आहे.
ग्राहक बघून किंमत
अवघ्या २२ दिवसांच्या बाळाची सात लाखांना विक्री झाल्याचे प्रस्तुत प्रकरणात उघड झाले आहे. परंतु ग्राहक बघून वेगवेगळ्या रकमेला बाळांची विक्री होत असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.