नवी मुंबईत ७० कोटींचा इन्कम टॅक्स घोटाळा उघड; सीजीएसटी कार्यालयाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2022 01:26 PM2022-01-11T13:26:35+5:302022-01-11T13:30:03+5:30
दोन व्यावसायिकांना अटक
नवी मुंबई : नवी मुंबई सीजीएसटी कार्यालयाने ७० कोटी रुपयांच्या वस्तू आणि सेवा कराचा समावेश असलेल्या बनावट इनपुट टॅक्स क्रेडिट रॅकेटचा पदार्फाश केला आहे. यामध्ये १४ हून अधिक व्यावसायिक कंपन्यांचा समावेश आहे. त्यांनी प्रत्यक्षात वस्तू किंवा मालाचा व्यवहार न करत ३८५ कोटींहून अधिक रुपयांच्या बनावट पावत्या सादर केल्या होत्या. त्याद्वारे सीजीएसटी विभागाचा सुमारे ७० कोटी रुपयांचा कर चुकवण्यात आला होता. मुंबई सीजीएसटी विभागाच्या केंद्रीय गुप्तवार्ता विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी दोन व्यावसायिकांना अटक झाली आहे.
सीजीएसटी कायदा २०१७ च्या तरतुदींचे उल्लंघन करून वस्तू किंवा सेवा न मिळवता एका कंपनीने २०.७५ कोटी रुपये तर दुसऱ्या कंपनीने ११.३१ कोटी रुपयांचे इनपुट टॅक्स क्रेडिटची फसवणूक करून मिळवले आहेत. प्रत्यक्षात मात्र या दोन्ही कंपन्या अस्तित्वात नसतानाही त्या संस्थांकडून बनावट आयटीसी मिळवत होत्या. अशाच प्रकारे इतर १२ कंपन्यांनी देखील ३८ कोटी रुपयांच्या बनावट आयटीसीचा लाभ घेतला आहे. त्यानुसार संचालक आणि मालक दोघांनाही सीजीएसटी कायदा २०१७ च्या कलम ६९ अंतर्गत कलम १३२ चे उल्लंघन केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे. त्यांना वाशी न्यायालयाने नुकतीच १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे. सीजीएसटी मुंबई विभागाने सुरू केलेल्या विशेष कर चुकवेगिरीविरोधातील मोहिमेतून हा प्रकार उघड झाला आहे.
५०० हून अधिक करचुकवेगिरीचे गुन्हे दाखल
विशेष मोहिमेमध्ये कर चुकवेगिरीचा छडा लावण्यासाठी चार महिने तपास सुरू होता. त्याअंतर्गत ५०० हून अधिक करचुकवेगिरीचे गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यापैकी ४० जणांना अटक करण्यात आली आहे. त्याद्वारे ४५५० कोटी रुपयांची कर चुकवेगिरी आढळून आली आहे. त्यामधील ६०० कोटी रुपये कर वसूल करण्यात आला आहे.