रेसकोर्सच्या पार्किंगमधून ७० वर्षीय आजोबांची दुचाकी चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2019 03:02 AM2019-05-07T03:02:27+5:302019-05-07T03:02:36+5:30
सुरक्षा भेदून महालक्ष्मी रेसकोर्सच्या पार्किंगमधून ७० वर्षीय आजोबांची दुचाकी चोरण्यात आली आहे. या प्रकरणी रविवारी ताडदेव पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मुंबई - सुरक्षा भेदून महालक्ष्मी रेसकोर्सच्या पार्किंगमधून ७० वर्षीय आजोबांची दुचाकी चोरण्यात आली आहे. या प्रकरणी रविवारी ताडदेव पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
उल्हास अनंतराव सावंत (७०) असे या आजोबांचे नाव असून ते परळमध्ये राहतात. पार्टटाइम छपाईचे काम करणारे सावंत २००१ पासून महालक्ष्मी रेसकोर्स येथे व्यायामासाठी येतात. दीड वर्षापूर्वी त्यांच्या मुलाने दुचाकी विकत घेतली. त्याच दुचाकीवरून ते रेसकोर्सला येत असत. १ मे रोजी ते नेहमीप्रमाणे सकाळी ६ वाजता दुचाकी घेऊन आले. रेसकोर्स गेट क्रमांक १ व २ येथील पार्किंगमधील सुरक्षारक्षकाच्या केबिनसमोर दुचाकी पार्क करून ते आत गेले.
तासाभराने ते परतले असता दुचाकी गायब होती. बरीच शोधाशोध करूनही दुचाकी न सापडल्याने दुचाकी टोइंग केल्याच्या संशयावरून त्यांनी ताडदेव वाहतूक चौकी येथे जाऊन चौकशी केली. मात्र, तेथे दुचाकी नव्हती. मित्रांनी गंमत म्हणून दुचाकी लपविली असावी असे वाटून त्यांच्याकडेही चौकशी केली. मात्र तेथेही दुचाकी न सापडल्याने अखेर रविवारी त्यांनी पोलिसांत तक्रार केली. दुचाकीच्या डिक्कीत हेल्मेट, चष्मा, मोटारसायकलचे इन्शुरन्स, पी.यू.सी., आर.सी. बुक. इत्यादी कागदपत्रे होती.
सावंत यांच्या तक्रारीनंतर, गुन्हा दाखल करीत ताडदेव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तत्काळ शोध सुरू केला. यात, एक संशयित पोलिसांनी ताब्यात घेतला असून अधिक तपास सुरू आहे.
यापूर्वीही झाली होती कारची चोरी
येथे वाहनांच्या देखरेखीसाठी स्वतंत्र अशी वाहतूक व्यवस्था आहे. त्यासाठी सुरक्षारक्षकही तेथे तैनात आहेत. मात्र, व्यायामासाठी येणाऱ्या सर्वसामान्यांच्या वाहनांकडे सुरक्षारक्षक लक्ष देत नसल्याचे तक्रारदार सावंत यांचे म्हणणे आहे. दोन वर्षांपूर्वी या पार्किंग लॉटमधून कार चोरी झाली होती. मात्र तपासाअंती ती हस्तगत करण्यात आली होती.