कोठारीमध्ये ७१ वर्षीय पुजाऱ्याची हत्या; अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 09:39 PM2019-01-22T21:39:20+5:302019-01-22T21:39:52+5:30
मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी येथे मंदिरातील ७१ वर्षीय पुजा-याची हत्या झाल्याची घटना २२ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजताचे दरम्यान उघडकीस आली. किसन शिवगिरी गोरे असे मृतकाचे नाव आहे.
मंगरुळपीर (वाशिम) : मंगरूळपीर तालुक्यातील कोठारी येथे मंदिरातील ७१ वर्षीय पुजा-याची हत्या झाल्याची घटना २२ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजताचे दरम्यान उघडकीस आली. किसन शिवगिरी गोरे असे मृतकाचे नाव आहे.
पोलीस पाटील सतीश क्षीरसागर रा. कोठारी यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कोठारी येथील भाऊराव डहाळे व पुरुषोत्तम ढगे यांनी फिर्यादिस येऊन सांगितले की, कोठारी येथील मुंगसाजी महाराज मंदिरातील पुजारी किसन शिवगिरी गोरे (७१) हे मंदिरात मूर्तीसमोर पलंगावर रक्ताचे थारोळ्यात पडले असून ते मृत पावले आहेत. मृतकाच्या डोक्यावर वार असून, याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भादंवी कलम ३०२ नुसार गुन्हा दाखल केला. मृतक पुजारी किसन गोरे हे कोठारी येथील मुंगसाजी महाराज मंदिरात राहत होते.
दरम्यान घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी नंदा पाराजे, ठाणेदार रमेश जायभाये, पोलीस उपनिरीक्षक चंदनकुमार वानखडे, मंजुषा मोरे व कर्मचारी अरविंद सोनोने, महादेव सोळंके, विनोद चित्तकवार, सचिन इंगोले, रवी वानखडे यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी केली. घटनास्थळी श्वान पथकालासुद्धा पाचारण करण्यात आले होते. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मंजुषा मोरे करीत आहेत.