घाटकोपरमध्ये कारमध्ये सापडले 72 लाख; निवडणूक अधिकाऱ्यांची कारवाई, आयकर विभागाकडून तपासणी सुरू

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 05:40 AM2024-03-21T05:40:46+5:302024-03-21T05:40:52+5:30

मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास केलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही रक्कम वाशीतील विकासकाची असल्याचे त्यांनी सांगितले असून, या प्रकरणाचा आयकर विभाग तपास करत आहे.

72 lakh found in car in Ghatkopar; Action of election officials, investigation by income tax department started | घाटकोपरमध्ये कारमध्ये सापडले 72 लाख; निवडणूक अधिकाऱ्यांची कारवाई, आयकर विभागाकडून तपासणी सुरू

घाटकोपरमध्ये कारमध्ये सापडले 72 लाख; निवडणूक अधिकाऱ्यांची कारवाई, आयकर विभागाकडून तपासणी सुरू

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घाटकोपरच्या नीलयोग मॉलबाहेर एका कारमधून इलेक्शन सेलच्या स्टॅटिक सर्व्हेलन्स स्क्वाडने ७२ लाख ३९ हजार ६७५ रुपयांची रोकड जप्त केली. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास केलेल्या कारवाईत दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही रक्कम वाशीतील विकासकाची असल्याचे त्यांनी सांगितले असून, या प्रकरणाचा आयकर विभाग तपास करत आहे.
नीलयोग मॉलसमोर एका कारमधून लाखो रुपये आणले जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार निवडणूक सेलने वाहनाची तपासणी केली असता त्यात ७२ लाख ३९ हजार ६७५ रुपये आढळले. या कारमधील दिलीप वेलजी नाथानी (५२), अतुल वेलजी नाथानी (५४) यांची चौकशी केली असता ते इन्कम टॅक्स प्रॅक्टिसनर व सीए  असल्याचे निष्पन्न झाले. ही रोकड वाशीतील अक्षर ग्रुप बिल्डर भरत पटेल यांनी दिल्याचे त्यांनी सांगितले. 

चौकशीअंती योग्य कारवाई
पुढील कारवाईसाठी दोघांना वाहनासह पंतनगर पोलिस ठाण्यात आणले. तेथे डेप्युटी कलेक्टर रवींद्र ठाकरे, तहसीलदार वृषाली पाटील व अन्य अधिकारी, आयकर विभागाचे अधिकारी मनीष कुमार यांनी चौकशी सुरू केली असून, सध्या ही रक्कम आयकर विभागाने ताब्यात घेतली आहे. चौकशीअंती योग्य कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले.
 गेल्या निवडणुकीत १० कोटींची रोकड जप्त
 २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेदरम्यान मुंबई पोलिसांनी १९ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. 
 १० कोटी ५१ लाख रुपयांची बेहिशोबी रोकड आणि तब्बल ४० कोटी रुपयांचे अमली पदार्थ हस्तगत केले. तसेच, ३९१ अवैध शस्त्रही हस्तगत केली होती.
 

Web Title: 72 lakh found in car in Ghatkopar; Action of election officials, investigation by income tax department started

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.