सोनू निगमच्या वडिलांच्या घरात ७२ लाखांची चोरी, माजी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 06:18 AM2023-03-23T06:18:04+5:302023-03-23T06:18:24+5:30
निकिताने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ओशिवऱ्यातील विंडसर ग्रँड या इमारतीत अगमकुमार हे एकटेच फोर बीएचकेमध्ये राहतात.
मुंबई : प्रसिद्ध प्ले बॅक सिंगर सोनू निगम यांचे वडील अगमकुमार (७६) यांच्या ओशिवऱ्यातील घरात जवळपास ७२ लाखांची घरफोडी करण्याचा प्रकार बुधवारी उघडकीस आला. याप्रकरणी सोनूची बहीण निकिता (३८) हिने ओशिवरा पोलिस ठाण्यात त्यांच्या माजी ड्रायव्हरवर संशय व्यक्त केल्यानंतर त्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
निकिताने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ओशिवऱ्यातील विंडसर ग्रँड या इमारतीत अगमकुमार हे एकटेच फोर बीएचकेमध्ये राहतात. त्यांच्या फ्लॅटमध्ये एक लाकडी कपाटात डिजिटल पासवर्ड असलेले लोखंडी लॉकर आहे. ८ महिन्यांपूर्वी अगमकुमार यांच्या गाडीवर रेहान नामक व्यक्ती ड्रायव्हर म्हणून नियुक्त होता. मात्र तो काम नीट करत नसल्याने त्याला काढून टाकण्यात आले. १८ मार्च रोजी अगमकुमार यांना कामाचे ७२ लाख रुपये मिळाले, जे त्यांनी घरातील कपाटाच्या डिजिटल लॉकरमध्ये ठेवले.
दुसऱ्या दिवशी त्यांनी लॉकर उघडून पाहिले तेव्हा त्यातील ४० लाख रुपये गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. २० मार्च रोजी अगमकुमार आणि निकिता हे काही कामासाठी सोनू यांच्या घरी गेले. मात्र घरी परतल्यावर लॉकरमधील ३२ लाख रुपये चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. सीसीटीव्ही फुटेज तपास असता रेहान १९ व २० मार्च रोजी अगमकुमार यांच्या घराजवळून सुटकेस घेऊन जाताना दिसला. त्यामुळे त्यानेच बेडरूमचा दरवाजा डुप्लिकेट चावीने उघडून चोरी केल्याचा संशय निकिता आणि तिच्या वडिलांना आहे.