4 जिल्ह्यांतील 720 गुंड तडीपार, गणेशाेत्सवात शांततेसाठी उपाययाेजना
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2021 12:32 PM2021-09-11T12:32:50+5:302021-09-11T12:33:09+5:30
नांदेड परिक्षेत्रात कारवाई : गणेशाेत्सवात शांततेसाठी उपाययाेजना
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शुक्रवारपासून सुरू झालेला गणेशाेत्सव शांततेत पार पडावा, कायदा व सुव्यवस्थेला कुठेही गालबाेट लागू नये म्हणून परिक्षेत्रात पाेलिसांनी विविध प्रतिबंधात्मक उपाययाेजना केल्या आहेत. त्याअंतर्गत चार जिल्ह्यातील तब्बल ७२० क्रियाशील गुंडांना तडीपार करण्यात आले आहे.
नांदेड परिक्षेत्रामध्ये तब्बल ५ हजार ८८५ सार्वजनिक गणेशाेत्सव मंडळे आहेत. या मंडळांना काेराेनाचे नियम पाळून गणेशाेत्सव साजरा करण्याची परवानगी पाेलीस प्रशासनाने दिली आहे.
यातील सर्वाधिक गणेशाेत्सव मंडळे नांदेड व लातूर जिल्ह्यात आहेत. या गणेशाेत्सवाचे विसर्जन १९ सप्टेंबरपासून सुरू हाेणार आहे. उत्सव काळात कुठेही शांतता भंग हाेऊ नये म्हणून पाेलिसांनी महिनाभरापासूनच प्रतिबंधात्मक कारवाईची तयारी सुरू केली आहे. शांततेसाठी धाेकादायक ठरणाऱ्या, यापूर्वी दंगली, भांडणांचे रेकाॅर्ड असलेल्या गुन्हेगारांवर फाैजदारी प्रक्रिया संहितेच्या विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे. त्याअंतर्गत धाेकादायक वाटणाऱ्या गुंडांना
तडिपार केले जात आहे. काहींना पाेलीस प्रशासनाच्या स्तरावर तर काहींना दंडाधिकाऱ्यांच्या मदतीने तडिपारीच्या नाेटीस बजावण्यात आल्या आहेत.
कुणाला पाेलीस ठाण्याच्या हद्दीबाहेर, कुणाला तालुक्याबाहेर, तर कुणाला जिल्ह्याबाहेर हद्दपार करण्यात आले आहे. त्यातही दाेन दिवस, पाच दिवस, आठवडाभर, महिनाभर असा तडिपारीचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. नांदेड परिक्षेत्रातील चार अट्टल गुंडांवर माेक्का, एमपीडीएची कारवाई करण्यात आली आहे. परभणीतील दाेघांवर माेक्का, तर नांदेडच्या दाेघांना एमपीडी अंतर्गत स्थानबद्ध करण्यात आले आहे. अवैध दारू विक्री करून अशांतता पसरविण्यासाठी कारणीभूत ठरणाऱ्या २८० जणांवर परिक्षेत्रात कारवाई करण्यात आली. याशिवाय फाैजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १०७, १०९, ११० अन्वये १४ हजार ६०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र लिहून घेण्यात आले आहे.
तगडा पाेलीस बंदाेबस्त
nतगडा पाेलीस बंदाेबस्त तैनात करणार गणेश विसर्जनाच्या वेळी अखेरच्या तीन दिवसांत नांदेड परिक्षेत्रात तगडा पाेलीस बंदाेबस्त तैनात केला जाणार आहे.
nस्थानिक पाेलिसांच्या दिमतीला राज्य राखीव पाेलीस दलांच्या तीन कंपन्या, दाेन प्लाटून व ३,२०० हाेमगार्ड तैनात केले जाणार आहेत. याशिवाय बाहेरून ३२५ प्रशिक्षणार्थी पाेलीस कर्मचारी, फाैजदार ते उपअधीक्षक असे ५० अधिकारी बाेलविण्यात येणार आहेत. हाेमगार्डमध्ये ५०० महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
५४ ठिकाणे संवेदनशील
nसण-उत्सवाच्या काळात दंगलीचे रेकाॅर्ड असलेली ५४ ठिकाणे संवेदनशील म्हणून परिक्षेत्रात नाेंद आहेत.
n सर्वाधिक २२ लातूरमध्ये, परभणी १६, नांदेड १३,हिंगाेली जिल्ह्यातील ३ ठिकाणांचा समावेश आहे.
सर्वाधिक ४७५ लाेक परभणी जिल्ह्यातील
nनांदेड येथील विशेष पाेलीस महानिरीक्षक कार्यालयातून मिळालेल्या
माहितीनुसार, यंदाच्या गणेशाेत्सवासाठी ७२० जणांना प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून तडिपार केले गेले आहे.
nत्यामध्ये सर्वाधिक ४७५ लाेक परभणी जिल्ह्यातील आहेत. नांदेड ११०, लातूर ४५, तर हिंगाेली जिल्ह्यातील ९० जणांचा त्यात समावेश आहे.