विविध सराफांकडून चोरीतील ७३ तोळे सोने जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2022 09:40 PM2022-09-21T21:40:04+5:302022-09-21T21:40:18+5:30
सराईत चोरट्यासह साथीदाराला अटक, दादर पोलिसांची कामगिरी
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : रात्रीच्या वेळेस घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगार अनिल कांबळेला दादर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. त्यांच्याकडून ३३ लाख किंमतीचा ऐवज जप्त करण्यास पोलिसांना यश आले आहे. चोरीतील सोने विविध सराफाना विकले होते. याप्रकरणी त्याच्याकडे अधिक तपास सुरु आहे.
दादर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजेंद्र सीताराम राणे (६०) हे गणपती निमित्ताने गावी गेले असताना २९ ऑगस्ट रोजी त्यांच्या घरातून ७३७ ग्रॅम सोन्याचे दागिने, १ किलो वजनाच्या चांदीच्या वस्तू आणि ३५०० रुपयांची रोकड चोरीला गेली. यामध्ये एकूण २९ लाख रुपयांची चोरी झाल्याप्रकरणी दादर पोलिसांनी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. त्यापूर्वी २७ ऑगस्ट रोजी अनुराग मोहन दुबे (६५) हे कामानिमित्त गुजरातला गेले असताना त्यांच्या घराच्या खिडकीतून प्रवेश करत ५८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, १ किलो चांदिच्या वस्तु आणि ४४९४ अमेरीकन डॉलर असा एकूण ६ लाख २९ हजार ५२०रुपयांचा मुद्देमाल चोरी गेले होता. याप्रकरणीही दादर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. लागोपाठ घडलेल्या या दोन घटनांनी खळबळ उडाली.
दादर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश मुगुटराव यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने आरोपीचा शोध सुरु केला. याच दरम्यान दादर पोलिसांनी ३१ ऑगस्ट रोजी वरळीच्या आदर्श नगर येथून निखील अनिल कांबळे याला एका घरामध्ये चोरी करताना रंगेहाथ पकडले.
त्याच्याकडे केलेल्या चौकशीत दादरमधील दोन्ही गुन्ह्यात त्यांचा सहभाग असल्याचे उघड होताच या गुन्ह्यात त्यांना अटक करण्यात आली आहे.
कांबळेच्या चौकशीतून साथीदार मोहंम्मद अकबर अक्रम शेख यांना अटक करण्यात आली.
कांबळे आणि शेख हा सराईत गुन्हेगार असून कुर्ला येथील नेहरू नगर पोलीस चौकीच्या मागील झोपडपट्टीत राहण्यास आहे. आरोपींकडून ७३ तोळे सोने जप्त करण्यात आले आहे. यामध्ये एकूण ३३ लाख किंमतीचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. आरोपीविरोधात नेहरूनगर, कुर्ला, पोलीस ठाण्यात ९ हुन अधिक गुन्हे नोंद आहेत. आरोपीकडून ३३ लाख किंमतीचा १ किलो चांदी, ५८ ग्रॅम सोन्याची लगड, ३९४४ अमेरीकन डॉलर तसेच दुसऱ्या गुन्ह्यातील १ किलो चांदी, ६९२ ग्रॅम सोन्याची लगड असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.