अॅट्रोसिटीची भीती दाखवून डॉक्टरकडून उकळले ७५ लाख अन् घाटकोपरमधून आवळल्या मुसक्या
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2020 02:14 PM2020-02-27T14:14:57+5:302020-02-27T14:48:03+5:30
डॉक्टर खंडणी प्रकरणातील फरार मनोज अडसुळला घाटकोपरहून केली अटक
पुणे - अॅट्रोसिटीची भिती दाखवून डॉ. रासने यांच्याकडून तब्बल ७५ लाख रुपये उकळणारा व गेले काही दिवस फरार असलेल्या मनोज अडसुळ याला गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने घाटकोपर येथून ताब्यात घेतले. आज सकाळी त्याला पुण्यात आणले आहे.
मनोज अडसुळ याचा अटकपूर्व जामीन न्यायालयाने तीन दिवसांपूर्वी फेटाळला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा शोध घेत होते. तो मित्राच्या वडिलांच्या घाटकोपरमधील पंतनगर येथील घरी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांचे एक पथक रात्री घाटकोपरला दाखल झाले. त्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास तेथे छापा घालून मनोज अडसुळ याला ताब्यात घेतले. याप्रकरणी डॉ. दीपक प्रभाकर रासने (वय ६९, रा. तपोवन सोसायटी, पर्वती) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ ऑक्टोबर २०१९ रोजी डॉक्टरच्या मुलाच्या दवाखान्यात एक महिला आली होती. ५०० रुपयांच्या तपासणी फि वरून त्यांच्यात वादावादी झाली. त्यानंतर संबंधीत महिनेने विश्रामबाग पोलिस ठाण्यात विनयभंग झाल्याचा तक्रार अर्ज दिला होता. त्यानुसार पोलिसांनी डॉक्टरची चौकशी केली असता, त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य न आढळल्यामुळे पोलिसांनी ती चौकशी बंद केली. मात्र मनोज अडसुळ याने बनाव रचत ती महिला अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करीत आहे. तुमच्या मुलाला अटक होईल. त्याच्या पासपोर्टवर शिक्का पडले. त्याला परदेशात जाता येणार नाही, असे सांगून त्यांना घाबरुन सोडले होते. त्यांच्याकडून ७५ लाख रुपयांची खंडणी वसुल केली. उरलेले ५५ लाख रुपये देण्यासाठी मनोज याने त्यांच्यामागे तगादा लावला. तेव्हा डॉ. रासने यांनी पोलीस मित्र असलेल्या जयेश कासट याला ही बाब सांगितली. त्याने डॉक्टरांचे पैसे परत दे नाही तर तुला व तुझ्या कुटुंबाला आत टाकत. अशा धमक्या देऊन त्याच्याकडून ५ लाख रुपये लाटले. कासट याच्या सततच्या त्रासामुळे मनोज अडसुळ याने पोलीस आयुक्तांची भेट घेऊन कासट आपल्याकडे खंडणी मागत असल्याची तक्रार केली. त्याच्या अर्जाची चौकशी करता त्यानेच डॉ. रासने यांच्याकडून खंडणी वसुल केल्याचे उघड झाल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तेव्हापासून तो फरार होता.